नाशिक : भाजपने महापालिकेत शिवसेनेला सत्तेत सोबत घेत उपमहापौरपद दिल्यानंतर या पदावरून शिवसेने (शिंदे गटा) त वाद निर्माण झाला आहे. उपमहापौरपदाची माळ विलास शिंदे यांच्या गळ्यात पडल्यानंतर नाराज झालेल्या महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांनी सोशल मीडियावरुन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठविले असून, साहेब आम्ही कुठे कमी पडलो, असा सवाल करत पक्षाचे महानगरप्रमुखपद तसेच नगरसेवक पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.
उद्धव ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदे बाहेर पडल्यानंतर शिवसेनेत नाशिकमधून कोणीही पुढे येत नव्हते, तेव्हा कोणतीही अट-शर्त न ठेवता भविष्याची चिंता न करता सर्वप्रथम मी शिवसेनेत प्रवेश करत उबाठाविरोधात संघर्ष केला. पक्षकार्यासाठी वेळ मिळावा म्हणून नोकरीसुद्धा सोडली.
म्युनिसिपल कर्मचारी सेनेच्या अध्यक्षपदावर सात वर्षे काम केले. संपूर्ण संघर्षाचा प्रवास पदासाठी नव्हता, तर संघटना उभी करण्यासाठी केला. शिवसेनेचा काळ कठीण असताना या संघर्षातून वाट काढली. शिवसेनेत पदांपेक्षा प्रामाणिक कार्य मोठे असते पण आज झालेल्या प्रकारावरून सामान्य शिवसैनिक फक्त आम्ही कुठे कमी पडलो असे विचारत असल्याचे तिदमे यांनी म्हटले आहे.
शिंदे व बोरस्तेंवर टीका
तिदमे यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचताना उपनेते अजय बोरस्ते व नवनिर्वाचित उपमहापौर विलास शिंदे यांच्यावर टीका केली आहे. तब्बल सव्वा वर्ष पक्षाशी वाटाघाटी करून प्रवेश केलेल्या अजय बोरस्ते यांच्याकडे जिल्हाप्रमुख उपनेते, महामंडळ व गटनेते अशी महत्त्वाची अनेक पदे दिली. मूळ शिवसैनिक नसतानाही त्यांच्यावर संधीचा पाऊस पाडला. लोकसभा निवडणुकीनंतर प्रवेश दिलेल्या विलास शिंदे यांना पक्षाच्या संपर्कप्रमुखपदी आणि उपमहापौरपदी बसविले. मग ज्यांनी पक्ष उभा केला, संघर्ष केला, निष्ठा जपली त्यांना का सतत डावलले जात आहे, पक्षाला साथ दिली हा आमचा दोष ठरला का, असा सवालदेखील तिदमे यांनी केला आहे.