Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil file photo
नाशिक

Aarakshan News | आरक्षणाबाबत शरद पवार यांना जाब विचारावा, विखे-पाटलांचा जरांगेंना सल्ला

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : मराठा आरक्षणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सकारात्मक भुमिका असताना सातत्याने त्यांनाच टार्गेट करणे योग्य नाही. मनोज जरांगे-पाटील यांनी फडणवीस यांच्या भुमिकेेचे स्वागत करताना महाराष्ट्राचे चारवेळेस मुख्यमंत्रीपद भुषविलेल्या शरद पवार यांनी आरक्षण का दिले नाही, याबाबत जाब विचारले पाहिजे, असा सल्ला महसुलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी जरांगे यांना दिला. आरक्षण मंजूरीच्या ठरावाबाबत विरोधी पक्षनेते विजय वडवेट्टीवार यांना विसर पडला असेल, असा खोचक टाेलाही त्यांनी लगावला.

मराठा आरक्षणावरुन जरांगे-पाटील यांनी उपोषण सोडताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका केली. बुधवारी (दि.२४) नाशिक दाैऱ्यावर असलेल्या महसुलमंत्री विखे-पाटील यांना याबाबत विचारले असता आरक्षणावरुन सातत्याने एकाच व्यक्तीला टार्गेट करणे योग्य नसल्याचे ते म्हणाले. तसेच फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनीच आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावला. पण, महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षणावरून झोपा काढल्याचा आरोप त्यांनी केला. महायुतीचे सरकार राज्यात पुन्हा आल्यानंतर मराठा समाजाचे १० टक्के आरक्षण टिकवण्यासाठी सर्वपक्षीय ठराव मंजूर करण्यात आला. कोणत्याही न्यायालयाने या ठरावाला स्थगिती दिली नसल्याचा दावा विखे-पाटील यांनी केला.

विखे-पाटील पुढे म्हणाले, महायुतीचे सरकार एखादा निर्णय घेताना सर्वांना विश्वासात घेते. पण ज्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले नाही, त्या पवार साहेबांना ते मान्य नाही. मराठा आरक्षणावरुन नाना पटोले, बाळासाहेब थोरात व उद्धव ठाकरे यांनी चुपी साधली असून त्यांच्या घशात हड्डी अडकली का? असा संतप्त सवालदेखील विखे-पाटील यांनी उपस्थित केला. क्लस्टर म्हणून दिंडोरीची जबाबदारी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे असून माझ्याकडे निरीक्षक म्हणून नगर व नाशिकची जबाबदारी आहे. समन्वयक म्हणून येत्या आठवड्यात पक्षीय स्तरावर बैठका घेणार असल्याचे विखे-पाटील यांनी स्पष्ट केले.

मिटकरी समाधानी

आमदार अमोल मिटकरी यांच्या फोन उचलत नसल्याच्या आरोपाकडे विखे-पाटील यांचे लक्ष वेधण्यात आले. त्यावर आजच्या अकोला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला ते उपस्थित होते. यावेळी त्यांचे समाधान झाले आहे. एखाद्या बाबतीत आमच्यात कम्युनिकेशन गॅप असू शकतो, असे विखे-पाटील म्हणाले. कॅबिनेटमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्री महाजन यांच्यातील खडाजंगीचे वृत्त चुकीचे असल्याचा दावा विखे-पाटील यांनी केला. आरएसएसच्या मुखपत्रातून काही सूचना करण्यात आल्या असून महायुती म्हणूनच निवडणूकांना सामोरे जाऊ, असे विखे-पाटील यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT