नाशिक : आठवडाभरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठा राजकीय भूकंप होण्याचे भाजपचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी वर्तविलेले भाकीत खरे ठरण्याची शक्यता आहे. सोमवारी (दि. २) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर ‘उबाठा’चे उपनेते सुधाकर बडगुजर यांनी पक्षसंघटनेतील फेरबदलांबाबत उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, या घडामोडींनंतर उबाठाचे जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी यांनी बुधवारी (दि. ४) तातडीची पत्रकार परिषद बोलविली असून, त्यात पक्षाची भूमिका मांडली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष फोडाफोडीला ऊत आला आहे. विशेषत: महायुतीने नाशिकला ‘उबाठा’ला संपविण्याचा जणू निर्धारच केला आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे माजी आमदार नरेंद्र दराडे, उपनेत्या निर्मला गावित यांनी शिंदे गटात प्रवेश करत ‘उबाठा’ला हादरा दिला. खरे तर त्याच सुमारास अन्य नाराजांचाही पक्षप्रवेश होणार असल्याची चर्चा होती, मात्र तो लांबणीवर पडला. परंतु आता विवाह सोहळ्यांच्या निमित्ताने नाशिकमध्ये आलेल्या मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यानंतर उबाठाला पुन्हा खिंडार पडणार हे आता दिसू लागले आहे. उपनेते बडगुजर यांनी एकीकडे मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी उबाठा महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्या कन्येच्या लग्नाला हजेरी लावल्याने उबाठाचे हे दोन्ही शिलेदार गळणार याची चर्चा सुरू झाली आहे. आता बडगुजर यांनी पक्षसंघटनेतील बदलांबाबत उघडपणे व्यक्त केलेल्या नाराजीनंतर या शक्यतेला बळ प्राप्त झाले आहे.
बडगुजर यांनी मंगळवारी (दि. ३) माध्यमांशी संवाद साधताना पक्षसंघटनात्मक बदल करताना वरिष्ठांनी कुणालाही विश्वासात घेतले नाही. त्यामुळे मीच नव्हे, तर आणखी १० ते १२ जण नाराज असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पक्षसंघटनेत बदल करता महानगरप्रमुख विलास शिंदे यांना आहे त्यापेक्षा वरचे पद मिळेल, अशी आशा होती. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे ते नाराज आहेत. लोकसभा निवडणुकीत आम्ही दोघांनी खा. राजाभाऊ वाजे यांना निवडून आणण्यासाठी जीवाचे रान केले. विरोधकांचे वारे असताना अशा प्रतिकूल परिस्थितीत वाजे निवडून आले. यामुळे साहजिकच शिंदेंसारख्या कार्यकर्त्याला न्याय मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र ते न झाल्याने गेल्या काही दिवसांपासून शिंदे हे पक्षात अस्वस्थ असल्याचे बडगुजर यांनी सांगितले.
पक्षसंघटनेतील बदल झाल्यानंतर त्या विषयीच्या भावना आणि नाराजी वरिष्ठांच्या कानी टाकली. मात्र त्यानंतरही दखल घेतली गेली नाही, असे नमूद करत माझ्यासह १० ते १२ जण नाराज असल्याचे बडगुजर यांनी सांगितले. या नाराजीबाबत पुढे काय होईल, हे येणारा काळच सांगेल, असे सांगत नाशिकमध्ये राजकीय भूकंप होण्याचे संकेतही बडगुजर यांनी दिले आहेत.
पक्षसंघटनेमध्ये करण्यात आलेले बदल हे अपेक्षित नव्हते. यामुळे १० ते १२ जण नाराज आहेत. याबाबत पक्षश्रेष्ठींपर्यंत भावना पोहोचविल्या आहेत. त्याची दखल अद्याप घेतलेली नाही. यामुळे नाराजी कायम असून, येणाऱ्या काळात काय होईल, हे सांगता येणार नाही.सुधाकर बडगुजर, उपनेते, शिवसेना (उबाठा)