नाशिक : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी(अजित पवार गट) महायुतीला नामोहरम करण्यासाठी नाशिक जिल्ह्यात महाविकास आघाडीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत हातमिळवणी केली आहे.
आगामी निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविल्या जाणार असून, जागा वाटपासंदर्भात प्रमुख नेत्यांची संयुक्त समिती गठीत केली जाणार आहे. स्थानिक पातळीवर ज्या पक्षाच्या उमेदवाराची निवडून येण्याची क्षमता असेल त्या पक्षाच्या उमेदवाराला महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांकडून एकत्रितरीत्या पाठींबा दिला जाईल, असा निर्धार महाविकास आघाडी व मनसेच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर केला. मुंबई महापालिकेसाठी काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला असताना नाशिकमध्ये मात्र महाविकास आघाडीच्या छत्रछायेखाली काँग्रेस, मनसे एकत्र आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना(उबाठा), काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, डाव्या पक्षांसह मनसेच्या नेत्यांनी सोमवारी (दि.१०) संयुक्त पत्रकार परिषद घेत निवडणुका महाविकास आघाडीद्वारे लढण्याचा निर्णय घोषित केला. यासंदर्भात गेल्याच आठवड्यात या पक्षांच्या स्थानिक नेत्यांची एक संयुक्त बैठक पार पडली होती. भाजपप्रणित महायुतीला रोखण्यासाठी जिल्ह्यातील नगरपरिषदा, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि महापालिका निवडणुकांमध्ये संघटीतपणे लढा देण्याचा निर्णय पूर्ण विचाराअंती या बैठकीत घेण्यात आल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. केंद्र व राज्यातील भाजपच्या सत्ताकाळात सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, व्यावसायिक देशोधडीला लागला आहे. याविरोधात आगामी निवडणुकांच्या माध्यमातून महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांनी वज्रमूठ उभारली आहे. आगामी निवडणुकासाठी दुबार मतदारांची नावे वगळून मतदार याद्या दोषमुक्त कराव्यात, लोकांचा इव्हीएमवर विश्वास राहिला नसल्याने पूर्वीप्रमाणेच मतपत्रिकांवर निवडणुका घेण्यात याव्यात, या आपल्या प्रमुख मागण्या असून या मागण्यांची दखल घेतली न गेल्यास प्रसंगी निवडणूक आयोगाविरोधात जनआंदोलन उभारण्याचा निर्धारही या बैठकीत व्यक्त केला गेला.
यावेळी उबाठा नेते वसंत गिते, संघटक विनायक पांडे, जिल्हाप्रमुख डी. जी. सुर्यवंशी, महानगरप्रमुख प्रथमेश गिते, राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे उपाध्यक्ष गोकूळ पिंगळे, शहराध्यक्ष गजानन शेलार, काँग्रेसचे राहुल दिवे, मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डॉ. डी.एल.कराड, अॅड. तानाजी जायभावे, भाकपचे राजु देसले आदी उपस्थित होते.
महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये जागा वाटपाचा निर्णय अद्याप झाला नसला तरी संयुक्त समिती नेमून यावर तोडगा काढण्यात येईल. नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर समितीमार्फत दौरे करून जेथे ज्या पक्षाच्या उमेदवाराची निवडून येण्याची क्षमता अधिक त्यास महाविकास आघाडीतील अन्य घटक पक्षांकडून पाठींबा दिला जाईल.डॉ. डी. एल. कराड, ज्येष्ठ नेते, माकप
भ्रष्ट महायुती सरकारविरोधात आवाज उठविण्याची सर्वांची नैतिक जबाबदारी असल्याने महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्रित निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला आहे. जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही. ज्या ठिकाणी महाविकास आघाडीत एकमत होणार नाही, अशा जागांवर गरजेनुसार मैत्रीपूर्ण लढती लढल्या जातील.वसंत गिते, ज्येष्ठ नेते, उबाठा.
मुंबईत काँग्रेस पक्षाने स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असला तरी प्रदेश नेत्यांनी निवडणुकांमधील आघाडीबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत. स्थानिक परिस्थिती पाहून महाविकास आघाडीत मनसेला बरोबर घेण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे.राहुल दिवे, प्रदेश सचिव, काँग्रेस.
स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार पक्षश्रेष्ठींनी दिले आहेत. भाजपविरोधात जे पक्ष सोबत येतील त्या सर्वांची मोट बांधून निवडणुका लढविल्या जातील. एक दोन जागा कमी मिळाल्या तरी चालेल पण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये भाजपला धडा शिकविला जाईल,गजानन शेलार, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष.
पक्षप्रमुख राज ठाकरे यांचा निर्णय मान्य असेल. राज्यात मनसे महाविकास आघाडीत सामील नसली तरी लोकशाही जिवंत ठेवण्याच्या भूमिकेतून नाशिकमध्ये मनसेने महाविकास आघाडीत सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षप्रमुख राज ठाकरे जो निर्णय घेतील तो मान्य असेल.दिनकर पाटील, प्रदेश सरचिटणीस, मनसे.