नाशिक : महायुतीतील भाजप व शिंदे शिवसेना यांच्यात रुसवा फुगवा झाले. हे रुसवे फुगवे दिल्ली दरबारी देखील पोहचले. यानंतर, महायुती एकसंघ होईल, ही अपेक्षा शुक्रवारी (दि.21) जिल्ह्यातील नगरपरिषदांच्या निवडणुक माघारीच्या अंतिम दिवशी फोल ठरली. होऊ घातलेल्या 11 नगरपरिषदांच्या निवडणुकीत महायुती दुभगंली आहे.
महाविकास आघाडीतही बिघाडी झाली आहे. भगूर येथे शिंदे शिवसेनेला रोखण्यासाठी भाजप, राष्ट्रवादीचे अजित पवार व शरद पवार गटासह उबाठा एकत्र आली आहे. सटाणा नगरपरिषदेत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपात बंडखोरी झाली आहे. भाजपात नव्या विरुद्ध निष्ठावान असा संघर्ष उभा राहिला आहे. शिंदे सेनेने उमेदवार दिला आहे. नगरसेवकपदाच्या निवडणुकीसाठी अजित पवार व शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र आली आहे. काँग्रेस स्वतंत्र लढत आहे. सिन्नर नगरपरिषदेत महायुतीत बिघाडी झाली असून शिंदे शिवसेना, भाजप व अजित पवारांच्या राष्ट्रवादीने स्वतंत्र उमेदवार रिंगणात उतरवले आहे. येथे महाविकास आघाडी एकसंघ राहिली.
नांदगाव, मनमाड नगरपरिषदेत अजित पवाराच्या राष्ट्रवादी विरोधात भाजप व शिंदे शिवसेना युती झाली आहे. या ठिकाणी उबाठाने स्वतंत्र उमेदवार दिले आहे. येवल्यात शिंदे सेना, शरद पवाराची राष्ट्रवादी विरोधात भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यात लढत होणार आहे. चांदवडमध्ये महायुतीसह महाविकास आघाडीतील सर्व घटकपक्षांनी स्वतंत्रपणे उमेदवार दिले आहेत. इगतपुरीत अजित पवारांची राष्ट्रवादी व शिंदेची शिवसेना एकत्र असून त्याविरोधात भाजप आणि उबाठा शिवसेना - काँग्रेस युतीने उमेदवार दिला आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये महायुतीत बिघाडी झाली असून भाजप, शिंदे शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादीने स्वतंत्रपणे उमेदवार रिंगणात उतरले आहेत. या ठिकाणी काँग्रेस स्वबळावर लढत आहे. ओझरमध्ये महायुती तुटली असून भाजप, शिंदे शिवसेना व अजित पवारांच्या राष्ट्रवादीने उमेदवार दिले आहे. येथे महाविकास आघाडीत बिघाडी झाली असून उबाठा शिवसेना व काँग्रेस स्वतंत्र लढत आहे. पिंपळगाव बसवंतमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी, भाजप व काँग्रेसमध्ये तिरंगी लढत होत आहे.
अशा आहेत नगराध्यक्षपदाच्या लढती
येवला : रुपेश दराडे (शिंदे शिवसेना + शरद पवार गट), राजेंद्र लोणारी (अजित पवार गट + भाजप)
चांदवड : शंभुराजे खैरे (उबाठा शिवसेना), विकी जाधव (शरद पवार गट), वैभव बागुल (भाजप), सुनील बागुल (काँग्रेस)
पिंपळगाव बसवंत : संतोष गागुर्डे (काँग्रेस), गोपाळकृष्ण गायकवाड (अजित पवार गट), डाॅ. मनोज बरडे (भाजप + शिंदे शिवसेना)
ओझर : अनिता घेगडमल (भाजप), जयश्री जाधव (उबाठा शिवसेना), प्रज्ञा जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस), श्वेता अहिरे (शिंदे शिवसेना), मालती बंदरे (काँग्रेस)
भगूर : अनिता करंजकर (शिंदे शिवसेना), प्रेरणा बलकवडे (अजित पवार गट + भाजप + राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट)
सिन्नर : हेमंत वाजे (भाजप), नामदेव लोंढे (शिंदे शिवसेना), विठ्ठल उगले (अजित पवार गट), प्रमोद चोथवे (महाविकास आघाडी)
नांदगाव : सागर हिरे (शिंदे शिवसेना + भाजप + रिपाइं), राजाभाऊ बनकर (अजित पवार गट)
मनमाड : योगेश पाटील (शिंदे शिवसेना + भाजप + रिपाइं), रवींद्र घोडेस्वार (अजित पवार गट), प्रविण नाईक (उबाठा शिवसेना)
इगतपुरी : मधुमालती मेहे (भाजप), शुभांगी दळवी (उबाठा शिवसेना + काँग्रेस), शालिनी खताळे (शिंदे शिवसेना + अजित पवार गट)
त्र्यंबकेश्वर : कैलास घुले (भाजप), त्रिवेणी तुंगार (शिंदे शिवसेना), दिलीप पवार ( काँग्रेस), सुरेश गंगापुत्र (अजित पवार गट)
सटाणा : योगिता मोरे (भाजप), रुपाली कोठावदे (भाजप बंडखोर), हर्षदा पाटील (शिंदे शिवसेना)