महाजन यांनी भान राखावे, माणिकराव कोकाटेंचा सल्ला  file photo
नाशिक

Nashik Politics | गिरीश महाजन यांनी भान राखावे, माणिकराव कोकाटेंचा सल्ला

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या सिन्नर मतदारसंघातील प्रस्तावित स्मारकावरून मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यात चकमक झाल्यानंतर अजित पवार गटाचे आमदार ॲड माणिकराव कोकाटे यांनी मंत्री नीट काम करत नाहीत, अशा शब्दांत महायुतीला घरचा आहेर दिला. मंत्री महाजन यांच्यावर शरसंधान साधत महाजन यांनी मानसिकता बदलावी. समाजभान राखून भाष्य करावे, असा सल्लाही आ. कोकाटे यांनी दिला.

ग्रामविकास विभागाच्या निधीवरून राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाजन, पवार यांच्यात खडाजंगी झाली. महाजन यांनी आपल्या विभागाला जास्त निधी मिळावा, अशी मागणी केली. यावर जमिनी विकून निधी द्यायचा का? असा संतप्त सवाल पवार यांनी केला. यावर महाजन यांनी सिन्नर तालुक्यातील स्मारकासाठी कोट्यवधीचा निधी कसा दिला? असा प्रतिप्रश्न केला. या वादावरून राष्ट्रवादीचे आमदार संतापले आहेत. सिन्नरचे आमदार ॲड.कोकाटे यांनी महाजन यांच्यावरच गंभीर आरोप करत, त्यांना काही कळत नाही असा टोला लगावला आहे. कोणाच्या मतदारसंघात काय विकासकामे चालू आहेत, याची माहिती घेवून मंत्र्यांनी जबाबदारीने बोलले पाहिजे असे सांगत, भान राखून बोलण्याचा सल्ला दिला. मंत्रालयात मंत्र्यानी आमदारांची कामे केली पाहिजे. याउलट मंत्री कुणाचेच ऐकत नाहीत. त्यांना आपल्या मंत्रालयात काय चालले आहे, तेच कळत नाही, असा गंभीर आरोप करत कोकाटे यांनी आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला आहे. आमदार विकासकामांसाठी निधी मागत असतो. पण कोणी मंत्री निधी वाटपावरून असे नखरे करत असेल, भांडण करत असेल तर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशाराही कोकाटे यांनी यावेळी दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी बैठक घ्यावी. आमदारांची कामे मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी मंत्र्यांना द्याव्यात, अशी मागणीही आ. कोकाटे यांनी केली.

..तर आदिवासी समाज विरोधात जाईल

एखाद्या विषयाचे गांभीर्य समजून महाजन यांनी बोलले पाहिजे, असा सल्ला देताना राघोजी भांगरे हे आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान आहेत. या विषयाला अर्थसंकल्पात मंजूरी देण्यात आली आहे. राज्यात आदिवासी समाज ९ टक्के असून २२ आमदार आहेत. त्यात आपल्याही पक्षात आमदार आहेत. त्यामुळे समस्त आदिवासी सरकारच्या विरोधात जाईल, असा इशारा देखील कोकाटे यांनी दिला. मंत्र्यांनी अशी वक्तव्ये करू नयेत. हा समाजाच्या अस्मितेचा विषय आहे. अर्थसंकल्पामध्ये घोषणा करूनही महाजन असे वक्तव्य करत असतील तर अर्थसंकल्पात घोषणा कशाला करायच्या, असा सवाल देखील कोकाटे यांनी केला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT