नाशिक : शिवसेने (उबाठा) चे उपनेते सुधाकर बडगुजर, माजी मंत्री बबन घोलप यांना प्रवेश देताना भाजपने नाशिक महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांची शिखर संघटना असलेल्या म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेवरही ताबा मिळविला आहे.
जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी गुरुवारी (दि. १९) महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनाला प्रथमच भेट देताना मुख्यालयातील संघटनेच्या कार्यालयात जाऊन बडगुजर यांच्या हस्ते सत्कार स्वीकारल्याने बडगुजर यांच्या रूपाने शिवसेने (उबाठा)ची संघटनाही भाजपने पळविल्याचे स्पष्ट झाले आहे.
म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना ही नाशिक महापालिकेतील एकमेव मान्यताप्राप्त कर्मचारी संघटना आहे. शिवसेना(उबाठा)ची अंगीकृत संघटना अशी म्युनिसिपल सेनेची ओळख असली, तरी या संघटनेची नोंदणी स्वतंत्र आहे. माजी मंत्री घोलप हे या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत, तर बडगुजर हे या संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आहेत. बडगुजर हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेनंतर त्यांची उबाठातून हकालपट्टी करण्यात आली, तेव्हा म्युनिसिपल सेनेचे पद त्यांना सोडावे लागणार असा दावा उबाठा नेत्यांकडून करण्यात येत होता. संघटनेच्या घटनेनुसार अध्यक्षपदाची नियुक्ती पाच वर्षांकरिता आहे. मात्र संस्थापक अध्यक्षांनी आदेश दिल्यास अध्यक्षपद सोडावे लागेल, अशी तरतूददेखील आहे. त्यामुळे घोलप सांगतील, तेव्हा बडगुजर यांना संघटनेचे पद सोडावे लागेल, अशा अविर्भावात उबाठा नेते होते. परंतु बडगुजर यांच्याबरोबर घोलप यांनीदेखील भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे म्युनिसिपल सेनाही आता भाजपच्या दावणीला गेली आहे. जलसंपदामंत्री महाजन यांनी गुरुवारी महापालिका मुख्यालयातील संघटनेच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी बडगुजर यांनी त्यांचे स्वागत केले. महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध राहू, असे आश्वासन यावेळी महाजन यांनी दिले. त्यामुळे म्युनिसिपल सेनेचा भाजपने ताबा घेतल्याचे स्पष्ट झाले.
मंत्री महाजन यांनी प्रथमच महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनाला भेट दिली. त्यांनी महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्या दालनात जाऊन चर्चा केली. यावेळी आयुक्त खत्री, जिल्हाधिकारी जलज शर्मा, अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर, प्रदीप चौधरी, स्मिता झगडे, सुधाकर बडगुजर आदी उपस्थित होते.