नाशिक : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर जोरात सुरू आहे. जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उपनेते व मंत्री दादा भुसे यांचे कट्टर विरोधक अद्वय हिरे यांनी भाजपात प्रवेश केला. येवल्याचे उबाठाचे नेते माजी आमदार मारोतराव पवार, संभाजी पवार यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. या दोन्ही प्रवेशाने जिल्ह्यात ठाकरे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.
मालेगावमधील हिरे व मंत्री भुसे यांच्यातील वाद सर्वश्रृत आहे. गत विधानसभा निवडणुकीत मंत्री भुसे व हिरे यांच्यात लढत झाली होती. त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिरेंना मोठी ताकद दिली होती. यात, मंत्री भुसे विजयी झाले होते. निवडणुकीनंतर मंत्री भुसे यांनी हिरे यांच्या शैक्षणिक संस्थांमधील गैरकारभार बाहेर काढण्यास सुरूवात केली. यानंतर हिरे घराण्यातील माजी आमदार तथा अद्वय हिरे यांचे बंधू अपूर्व हिरे यांनी भाजपात प्रवेश केला. त्यावेळी अद्वय हिरे यांचा प्रवेश झाला नव्हता. परंतु, अद्वय हिरे यांनी आता भाजपात प्रवेश केला. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशामुळे पुन्हा एकदा भुसे विरुद्ध हिरे हा राजकीय संघर्ष तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
येवला विधानसभेतचे प्रतिनिधीत्व केलेले ज्येष्ठ नेते मारोतराव पवार व त्यांचे पुतणे येवला पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी पवार यांनी ठाकरे शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. संभाजी पवार यांनी यापूर्वी मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. गत निवडणुकीतही पवार यांनी भुजबळ यांना विरोध दर्शवत महाविकास आघाडीचे उमेदवारांमागे ताकद उभी केली होती. परंतु, आगामी निवड़णुकीत समीकरणे लक्षात घेत पवार यांनी मंत्री भुजबळ यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीत प्रवेश केला. या प्रवेशाने येवल्यात राष्ट्रवादीला मोठे बळ मिळाले आहे.