नाशिक : माजी खासदार हेमंत गोडसेंपाठोपाठ माजी नगरसेवक बळीराम तथा मामा ठाकरे यांनीही शिवसेना (शिंदे) पक्षातील गटबाजीवर शरसंधान साधले आहे. शिवसेना शिंदे गटात चमचेगिरी, हुजरेगिरी करणाऱ्यांनाच स्थान असून संघटनेत विचारात घेतले जात नसल्याची टीका करत सिडकोतील घरे फ्री होल्ड करण्यासह जनतेच्या प्रश्नांबाबत निर्णय न घेतल्यास आपण पक्षत्याग करू, असा इशाराच ठाकरे यांनी पक्षनेतृत्वाला दिला आहे. त्यामुळे गोडसेंसह आता मामा ठाकरेही भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.
शिवसेनेच्या ठाकरे गटाला धक्का दिल्यानंतर भाजपकडून आता मित्रपक्ष शिवसेना(शिंदे)गटाला देखील हादरे बसू लागले आहेत. नाराज माजी खासदार गोडसे काही माजी नगरसेवकांसोबत भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. शिंदे गटात पक्षशिस्त नसल्याची टीका गोडसे यांनी केली असली तरी सध्या भाजपात जाण्याचा कोणताही विचार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. गोडसे यांची नाराजी दूर होत नाही तोच माजी नगरसेवक मामा ठाकरे यांनी देखील शिंदे सेनेतील गटबाजीवर बोट ठेवले आहे. ठाकरे देखील पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.
निष्ठावंत शिवसैनिक असूनही पक्षात विचारणा केली जात नसल्याची खंत ठाकरे यांनी व्यक्त केली. पक्षात वाढती गटबाजी, नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष आणि आश्वासनांची पूर्तता न झाल्यामुळे आम्हाला नाईलाजाने इतर पक्षात जाण्याचा विचार करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याभोवतीच्या चमच्यांमुळे भेट होऊ शकली नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे.
नागरिकांचे प्रश्न सुटावेत यासाठी आपण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मार्ग निवडला. मात्र, सिडको फ्री होल्ड करण्याबाबत तीन वेळा पत्र दिले. परंतु, प्रश्न सुटत नाहीत. निष्ठावंत असूनही संघटनेत विचारात घेतले जात नाही. त्यामुळे आता वेगळा विचार करावा लागत आहे.मामा ठाकरे, माजी नगरसेवक, शिवसेना शिंदे गट