डॉ. अद्वय हिरे pudhari file photo
नाशिक

Nashik Politics : अद्वय हिरे यांचे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सदस्यत्व रद्द

Krushi Utpanna Bazar Samiti - Malegaon | सर्वसाधारण सभांना गैरहजर; जिल्हा उपनिबंधकांचा निर्णय

पुढारी वृत्तसेवा

मालेगाव : शिवसेना (ठाकरे गट) उपनेते व मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. अद्वय हिरे यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय जिल्हा उपनिबंधक फैय्याज मुलाणी यांनी दिला आहे. बाजार समिती प्रशासनाला या संदर्भातील आदेश मंगळवारी (दि.24) प्राप्त झाले.

नुकत्याच विधानसभा निवडणुकीत हिरे यांचा शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या विरोधात लढताना पराभव झाला होता. त्यानंतर आता त्यांचे सभापतीपद देखील रद्द झाल्याने हिरे गटाला मोठा धक्का बसला आहे. मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे टेहरे येथील मतदार धर्मा नारायण शेवाळे यांनी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे 23 ऑगस्ट रोजी यासंदर्भात तक्रार अर्ज केला होता. सभापती बाजार समितीच्या सलग सात मासिक सर्वसाधारण सभांना गैरहजर असल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी केली होती.

या अर्जानुसार निबंधक यांच्याकडे वेळोवेळी सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान अ‍ॅड. अनंतराव जगताप यांनी हिरे यांच्या वतीने म्हणणे मांडले होते. 15 नोव्हेंबर 2023 ते 14 ऑगस्ट 2024 या कालावधी दरम्यान, जिल्हा बँकेचे कर्ज थकवल्या प्रकरणात हे तुरुंगात असल्यामुळे ते सभांना उपस्थित राहण्यास असमर्थ असल्याचा युक्तिवाद केला होता. तर तक्रारदार शेवाळे यांनी हिरे हे सभापती असून देखील बाजार समितीच्या सलग 5 मासिक सर्वसाधारण सभांना कोणतीही पूर्व सूचना न देता व रजा अर्ज न देता गैरहजर असल्याने त्यांचे सभासदत्व रद्द करावे, अशी मागणी केली होती. याप्रकरणी सुनावणीचे कामकाज पूर्ण झाल्यानंतर जिल्हा उपनिबंधक फैय्याज मुलाणी यांनी हिरे यांचे सदस्यत्व रद्द करण्यात येत असल्याचा निर्णय दिला.

बाजार समितीचे राजकारण पुन्हा बदलणार

एप्रिल 2023 मध्ये बाजार समितीच्या झालेल्या निवडणुकीत हिरे गटाने 18 पैकी 15 संचालक महविकास आघाडी प्रणित कर्मवीर भाऊसाहेब हिरे पॅनलचे निवडणुन आले होते. त्यामुळे भुसे गटाला मोठा धक्का बसला होता. मात्र आता हिरे यांचे सदस्यत्व रद्द झाल्यामुळे बाजार समितीचे राजकारण पुन्हा बदलण्याची चिन्हे आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT