नाशिक : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिबिर सुरू असताना भाजपने दर्गे पाडण्याचे काम सुरू केले आहे. या कारवाईविरोधात मोर्चे काढले जावेत, शिबिराच्या बातम्या दाखविल्या जावू नयेत हा भाजपचा हेतू असल्याचा दावा ठाकरे सेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांनी केला.
राऊत म्हणाले, निवडणूकीच्या पराभवानंतर अनेकांना असे वाटले की, शिवसैनिक खचला असेल. शिवसैनिक घरी बसला असेल, दहशतीखाली असेल. पण आजच्या शिबिराने दाखवून दिले की, नाशिकचा शिवसैनिक खणखणीत आहे. अशा पराभवाने आम्ही खचून जाणार नाही. यापेक्षा वाइट काळ आपण पाहिला आहे. स्वत: शिवसेनाप्रमुखांनी तो अनुभवला आहे. या सगळ्या खराब काळाची जी व्यक्ती साक्षी असते, ती उज्वल भवितव्याची निर्माते असते. 'छावा' चित्रपटात जो संभाजी महाराजांचा संघर्ष दाखविला, तोच आपल्या वाट्याला असल्याचेही राऊत म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका करताना राऊत म्हणाले, 'सध्या राज्यात 'ठाणे की रिक्षा, चेहरेपे दाढी, चष्मा' असे सुरू आहे. हे आता पुन्हा एकदा गावाला गेले आहेत. आज पौर्णिमा आहे. अमावस्या आहे. कुणाचा बकरा कापणार?. आता पौर्णिमा अमावस्या आली की महाराष्ट्राला भीती वाटत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
प्रत्येक निवडणुकीत बूथप्रमुखांनी मतदार यादीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. तो बूथ मॅनेजमेंटचा आत्मा असून, त्यास सर्वस्व मानून गटप्रमुखांनी अभ्यास करणे गरजेचे आहे. निवडणुका जिंकण्यासाठी एका विधानसभा मतदारसंघामध्ये किमान ३०० गटप्रमुख तयार करावे. बूथप्रमुखांनी संपर्क, संवाद आणि संबंध या त्रिसूत्रीद्वारे कामाला लागावे, असे आवाहन शिवसेना नेते विनायक राऊत यांनी केले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आयोजित निर्धार शिबिरात 'बूथ व्यवस्था व मतदारयादी' या विषयावर राऊत यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. राऊत यांनी बूथप्रमुखांचे महत्त्व विशद करत, मतदारयादीवर कसे काम करायचे याचे सविस्तर विवेचन केले. पूर्वीच्या निवडणुका लढविताना पावित्र्य होते, विचार होता. परंतु आता ईव्हीएममुळे हे पावित्र्य भंग पावले आहे. विधानसभा निवडणुकीत ५७ मतदारसंघ असे आहेत की, तेथे ठाकरे गटाच्या उमेदवारांचा अवघ्या ८०० ते १२०० मतांनी पराभव झाला आहे. येथील मतदारांच्या यादीमध्ये किमान दहा टक्के मतदार बोगस घुसविण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. बूथप्रमुखांनी कायम मतदारांच्या संपर्कात राहून त्यांच्याशी संवाद साधावा, त्यांच्याशी संबंध तयार करावेत. या त्रिसूत्रीवर काम केल्यास निवडणुका जिंकणे सोपे जाईल, असे राऊत यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीवर मी जास्त बोलणार नाही. मी त्यांना जास्त महत्त्व देत नाही, असे आदित्य ठाकरेंनी सांगितले. त्यांच्या नाराजीची भाजपने काळजी घ्यावी, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
उपमुख्यमंत्री शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीवर आदित्य ठाकरे यांनी बुधवारी (दि.16) नाशिक येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदेंचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टीका केली. एकनाथ शिंदे हे गद्दार गँगचे लीडर आहेत. ते आज गावी जाणार आहेत. चंद्र आज कोणत्या दिशेला आहे, हे माहीत नाही. पण त्यांचे नाराजीनाट्य सुरू झाले आहे. नाराजीनाट्य सुरू झाले की ते गावी जाऊन प्रॅक्टिस करून येतात, अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी शिंदेंवर टीका केली. भाजप सत्तेत असतानाही दंगली घडत आहेत आणि हे सरकारचे अपयश आहे. जातीयवाद, दंगली वाढत असल्याने या सरकारला प्रशासन चालविता येते की नाही? असा सवाल ठाकरे यांनी केला. ज्या शहरात कधी दंगली घडत नव्हत्या, त्या शहरात आता दंगली उसळत असून, गुन्हेगारी वाढली आहे. मुंबईतील गॅंगवार स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी अतिशय कठोर पावले उचलत गाडले होते. मुंबईत आता आठवडयाला तीन खून होत आहेत. हे सरकारचे अपयशच असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. ज्या राज्यात भाजपची सत्ता आहे आणि तेथील सत्ताधारी भाजप सरकारला योजनेतील आश्वासनांनुसार जनतेला काही देता आली नाही की सरळ दंगली घडविल्या जात असल्याचा घणाघातही ठाकरे यांनी यावेळी केला. यावेळी खासदार संजय राऊत, अरविंद सावंत आदी उपस्थित होते.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आज आपल्यात शरीराने नसले तरी, प्रत्येकाच्या मनात आहेत. त्यामुळे बाळासाहेबांचे विचार हाच आत्मा असून तो आजही आपल्या मनगटात आणि रोमारोमात आहे. त्यामुळे संघटनेची पुनर्बांधणी करताना शिवसैनिकांना हाच आत्मा समजून सांगितला पाहिजे. प्रत्येकाने आपआपली जबाबदारी पार पाडली तर संघटना पुनरुज्जीवित होईल, असे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले.
निर्धार शिबिरात 'संघटनेचा आत्मा आणि पुनर्बांधणी' या विषयावर विरोधी पक्षनेते दानवे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. दानवे म्हणाले की, देशात सध्या भाजप उन्मत्त हत्तीप्रमाणे काम करत आहे आणि या उन्मत्त हत्तीला रोखण्याचे बळ केवळ शिवसेनेत आहे. त्यामुळे हा हत्ती नष्ट करण्याचे काम येत्या काळात शिवसैनिकांनी करायचे आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून कामाला लागले पाहिजे. ‘शिवसेना संपली आहे’, असे काही जण सांगतात. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर रोज टीका करतात. ठाकरे, राऊत आपली भूमिका मांडत असून, ते डगमगले नाहीत. शिवसेनेला नव्याने उभारी द्यायची असेल तर जनतेपर्यंत गेले पाहिजे. बाळासाहेबांचे विचार जनतेपर्यंत पोहोचले पाहिजेत. त्यासाठी स्थानिक पातळीवर आंदोलने उभी केली पाहिजे. काही जण फक्त फोटो काढण्यापुरते आंदोलन करतात. त्यामुळे शिवसैनिक आपल्या जबाबदाऱ्या विसरत चालले आहेत, असे सांगत दानवे यांनी शिवसैनिकांचे कानही टोचले
तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अधिकार नसताना बेकायदेशीरपणे अधिवेशन बोलावून त्यात बहुमत चाचणी घेतली. त्यानंतर राज्यात असंवैधानिक सरकार आले. खरी शिवसेना कोणाची ही बाब स्पष्ट असतानादेखील त्याबाबतचा निर्णय न्यायालयात प्रलंबित आहे. मात्र, नियोजित सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सूत्र हाती घेतल्यानंतर जुलै महिन्याच्या अखेरीस खऱ्या शिवसेनेचा निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागेल, असे भाकीत ॲड. असिम सरोदे यांनी वर्तविले.
ठाकरे सेनेतर्फे आयोजित विभागीय शिबिरात कार्यकर्त्यांवरील 'खोटे गुन्हे, फेक नरेटिव्ह आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य' या विषयावर ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप आणि शिंदे सेनेवर हल्ला करताना तपास यंत्रणांचा चुकीच्या पद्धतीने वापर करून खोटे गुन्हे दाखल करण्याचे सत्र सुरू आहे. तसेच फेक नरेटिव्हलादेखील काही मर्यादा ठेवली नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्यात भारत १०७ व्या क्रमांकावर घसरला आहे. खोट्या माहितीची मोठी किंमत मोजून भाजप फेक नरेटिव्ह पसरविण्याचे काम करीत आहे. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम राज्यातील असंवैधानिक पक्ष आणि भाजपकडून केला जात असून, कोणतीही माहिती पुढे पाठविताना त्याची शहानिशा करण्याचा अधिकार आपल्याला देण्यात आला आहे. त्याचा प्रत्येकाने वापर करण्याची गरज असल्याचेही ॲड. सरोदे म्हणाले.