नाशिक : नाशिक महापालिकेत भाजप, शिवसेना(शिंदे गट) व राष्ट्रवादी अजित पवार गट महायुती फिस्कटण्याची चिन्हे निर्माण होऊ लागली आहेत. भाजपकडे गत निवडणुकीतील ६६ तर गेल्या काही महिन्यात प्रवेश केलेले १३ असे एकूण ७९ माजी नगरसेवकांची संख्या झाली असताना शिवसेना शिंदे गटाने ४५ तर राष्ट्रवादीने ३० जागांची मागणी केली आहे. त्यामुळे पक्षात मोठ्या संख्येने असलेल्या इच्छूकांना न्याय द्यावा की मित्रपक्षांना असा पेच भाजप नेत्यांसमोर निर्माण झाला आहे.
नाशिक महापालिकेसाठी १०० प्लसचा नारा भाजपचे प्रभारी तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी दिला आहे. भाजपकडे ३१ प्रभागांसाठी तब्बल १०६७ इच्छूकांनी अर्ज दाखल केले आहेत. इच्छूकांच्या मोठ्या संख्येमुळे स्वबळावर निवडणूक लढविण्याची इच्छा भाजपच्या स्थानिक नेत्यांनी प्रदर्शित केली आहे. मात्र महापालिका निवडणुकीत महायुती करण्याच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचना असल्याने भाजप प्रभारी महाजन, शिंदे गटाचे नेते तथा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यातील चर्चेनंतर भाजप व शिंदे गटाच्या स्थानिक नेत्यांच्या बैठकीचा सिलसिला शुक्रवारपासून सुरू झाला.
सुरूवातीला शिंदे गटाला २२ ते २५ जागा देण्याची तयारी भाजप नेत्यांनी दर्शविली. मात्र, नगरपरिषद निवडणुकांच्या निकालामुळे शिंदे गटाच्या नेत्यांची आशा वाढली आहे. सन्मानजनक जागा मिळाव्यात, असे सांगत सुरूवातीला शिंदे गटाने ५० जागांचा प्रस्ताव भाजपसमोर ठेवला. परंतु त्यानंतर ४५ जागांपर्यंत मागे येण्याची तयारी शिंदे गटाच्या नेत्यांनी दर्शविली. इतक्या जागा शिंदे गटाला देण्यास भाजप नेते इच्छूक नसल्याचे सांगण्यात येते. भाजपचे प्रभारी महाजन सोमवारी(दि.२२) नाशिक दौऱ्यावर होते. युतीबाबत शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांशी चर्चा केली. परंतु जागावाटपावर एकमत होऊ शकले नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.
चर्चेचे गुऱ्हाळ, स्वबळाची तयारी
मित्रपक्षांकडून अवाजवी मागणी केली जात असल्याचे भाजपच्या स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे भाजपकडून चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असल्याने शिंदे गटानेही स्वबळाची तयारी केली असून काही प्रभागामंध्ये प्रचार देखील सुरू केला आहे. नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्ये शिंदे गटाला घवघवीत यश मिळाल्याने महापालिका निवडणुकीसाठी शिंदे गटाच्या अपेक्षांना धुमारे फुटले आहेत.
मनसेचे माजी नगरसेवक गळाला?
महायुतीच्या जागावाटपात तोडगा निघत नसल्यामुळे भाजपकडून शिवसेनेसह मनसेच्या ठराविक प्रभागांमधील काही माजी नगरसेवकांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे समजते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवसापर्यंत जागा वाटपाचा तोडगा निघाल्यास निवडून येण्याची क्षमता असलेल्या माजी नगरसेवकांना पक्षात प्रवेश दिला जाणार असल्याची चर्चा आहे.
युतीसाठी शिंदे गट आग्रही
भाजपबरोबर युती करण्यासाठी शिवसेना शिंदे गटातील काही नेते आग्रही असल्याचे वृत्त आहे. स्वबळावर निवडणूक लढविल्यास मतांचे विभाजन होऊन पक्षाला फटका बसेल, अशी या नेत्यांची धारणा आहे. शिंदे गटातील काही नगरसेवक भाजपकडून निवडणूक लढविण्याची शक्यता असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.