इच्छुक झाले फार, साऱ्यांचाच 'मध्य'वर भार ! pudhari photo
नाशिक

Nashik Political News | इच्छुक झाले फार, साऱ्यांचाच 'मध्य'वर भार !

पुढारी वृत्तसेवा
नाशिक : आसिफ सय्यद

कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या आणि दलित, मुस्लीम मतांची संख्या निर्णायक असलेल्या नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील जनतेने गेल्या दोन निवडणुकांमध्ये मोदी लाटेवर स्वार होत प्रा. देवयानी फरांदे यांच्या रुपाने भाजपवर विश्वास टाकला. बदलत्या काळात शिवसेना, राष्ट्रवादीची झालेली शकले, त्यातून उद‌्भवलेली राजकीय परिस्थिती, ॲन्टी इन्कबन्सी आणि पक्षांतर्गत इच्छुकांनी थोपटलेले दंड यामुळे फरांदे यांना आगामी निवडणूक तितकीशी सोपी राहिलेली नाही. त्यातच निवडणूक पार्श्वभूमीवर दोन समाजांत तेढ निर्माण करण्याचे होत असलेले प्रयत्न, मराठा आरक्षण मुद्द्यावरून बदललेली जातीय समीकरणे लक्षात घेता काँग्रेस, शिवसेना, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकसंधपणे जोमाने लढल्यास या मतदारसंघातील विजयाचे गणित बदलण्याची शक्यता आहे.

दलित-मुस्लीम मतांची संख्या अधिक असलेला नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघ वस्तुत: काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जात असे. २००९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर मात्र 'लाटेवर स्वार होणारा मतदार' अशी या मतदारसंघातील लोकांची ओळख बनली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 'नवनिर्माणा'च्या सादेला प्रतिसाद देत या मतदारसंघातील जनतेने वसंत गिते यांना निवडून दिले. मनसेचा करिश्मा फार काळ चालला नाही. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत या मतदारसंघातील जनता मोदी लाटेवर स्वार झाली. मतदारांनी भाजपच्या प्रा. देवयानी फरांदे यांना सलग दोन निवडणुकांमध्ये विजयी करत मतदारसंघ किंबहुना नाशिकच्या विकासाची संधी दिली. २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या डॉ. हेमलता पाटील यांचा तब्बल २८,३९८ मतांनी पराभव करत फरांदे या पुन्हा विधानसभेत गेल्या. गेल्या दोन निवडणुकांत मतदारसंघात केलेली कामे, आणि विविध प्रश्नांवर विधिमंडळात उपस्थित केलेल्या मुद्द्यांच्या आधारे फरांदे आगामी निवडणुकीच्या माध्यमातून हॅटट्रिक साधण्याच्या तयारीत आहेत. मात्र बदललेली राजकीय परिस्थिती फरांदे यांच्यासमोर नवी आव्हाने निर्माण करणारी असल्याचे म्हणता येईल.

२०१९ निवडणुकीतील परिस्थिती

  • प्रा. देवयानी फरांदे (भाजप)- ७३,४६०(विजयी)

  • डॉ. हेमलता पाटील (काँग्रेस)- ४५,०६२(पराभूत)

  • नितीन भोसले (मनसे)- २२,१४०

  • संजय साबळे- (वंचित बहुजन आघाडी)- ९,१६३

२०१४ च्या निवडणुकीत भाजपसमवेत अखंड शिवसेना पाठीशी उभी होती. यंदा मात्र शिवसेनेत ठाकरे आणि शिंदे असे दोन गट निर्माण झाले असून, शिंदे गट भाजपसमवेत, तर ठाकरे गट विरोधात उभा ठाकला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचीही तीच परिस्थिती आहे. राष्ट्रवादीचा अजित पवार गट भाजपसमवेत असला तरी शरद पवार गट मात्र विरोधात उभा आहे. ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेसने महाविकास आघाडीच्या रूपाने आव्हान उभे केले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची वाढलेली ताकद दिसून आली. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत नाशिक मध्य मतदारसंघातून महायुतीचे हेमंत गोडसे यांना ९४,४२९ मतांची आघाडी होती. अलीकडील लोकसभा निवडणुकीत मात्र नाशिक मध्य मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना ३,८०६ मतांची आघाडी मिळाली. यामागे लोकसभा निवडणुकीतील गणिते आणि खुद्द महायुतीचे उमेदवार गोडसे यांच्याबाबत निर्माण झालेली ॲन्टीइन्कबन्सी कारणीभूत असली तरी, गत दोन पंचवार्षिकमध्ये आमदारकी भूषविणाऱ्या फरांदे यांना या अन्टीइन्कबन्सीचा फटका बसणारच नाही, असे समजण्याचे कारण नाही. हिंदुत्ववादी मते सांभाळताना दलित आणि मुस्लीम मतदारामध्ये विश्वास निर्माण करण्यात फरांदे यशस्वी ठरू शकलेल्या नाहीत. त्यातच फरांदे यांचे पारपंरिक राजकीय वैरी समजले जाणारे शिवसेना ठाकरे गटाचे वसंत गिते यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याचे जाहीर केले आहे. हा मतदारसंघ महाविकास आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला जाणार असल्याचे जवळपास निश्चित आहे.

डॉ. हेमलता पाटील यांचीही दावेदारी

काँग्रेसतर्फे डॉ. हेमलता पाटील यांनी निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. गिते आणि डॉ. पाटील यांच्यापैकी महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार, हे गुलदस्त्यात आहे. या दोन्ही पक्षांनी मैत्रीपूर्ण लढतीचा निर्णय घेतल्यास मात्र फरांदे यांना महाविकास आघाडीच्या मत विभाजनाचा फायदा होऊ शकेल. राज्यातील महायुती सरकारमार्फत राबविण्यात येत असलेली 'लाडकी बहीण' योजना फरांदे यांच्या मदतीला धावून येऊ शकते. आगामी विधानसभा निवडणुकीत मनसे आणि वंचित बहुजन आघाडीची भूमिकाही महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मनसेने स्वतंत्र उमेदवार उभा करण्याचे जाहीर केले आहे. त्यातच मराठा आरक्षणाचे प्रमुख मनोज जरांगे-पाटील यांनी या निवडणुकीत नाशिक मध्य मतदारसंघातून उमेदवार उभा केल्यास ही निवडणूक बहुरंगी ठरण्याची शक्यता आहे.

काँग्रेसला कमबॅकची संधी?

आगामी विधानसभा निवडणूक माध्यमातून नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेसला 'कमबॅक'ची संधी असल्याची चर्चा आहे. महाविकास आघाडीने एकसंध राहून निवडणूक लढविल्यास काँग्रेसला या मतदारसंघातून आमदार मिळू शकतो. अर्थात यासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्षांना आणि त्या पक्षांच्या नेते पदाधिकाऱ्यांना आपापसातील मतभेद, मनभेद विसरून एकत्र येण्याची गोष्ट साध्य करावी लागेल. काँग्रेसतर्फे या मतदारसंघातून डॉ. पाटील यांच्यासह शाहू खैरे, राहुल दिवे हेही इच्छुक आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे गोकुळ पिंगळे, गजानन शेलार, नितीन भोसले यांचीही नावे चर्चेत आहे. तर शिवसेनेच्या ठाकरे गटाने वसंत गिते यांच्या उमेदवारीचा ठराव करत पक्षश्रेष्ठींकडे पाठविला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडते हे बघणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

महायुतीत इच्छुकांची भाऊगर्दी

आ. फरांदे यांच्यापुढे विरोधी पक्षांबरोबरच स्वपक्षातील इच्छुकांनीही आव्हान उभे केले आहे. भाजपतर्फे स्थायी समिती माजी सभापती हिमगौरी आहेर-आडके आणि सुरेश पाटील तसेच लक्ष्मण सावजी, विजय साने निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. भाजपचा मित्रपक्ष शिवसेना शिंदे गटाचे उपनेते अजय बोरस्ते हेही या मतदारसंघातून उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार मानले जातात. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून रंजन ठाकरे इच्छुक आहेत. ऐनवेळी भुजबळ कुटुंबीयातूनही उमेदवारीसाठी नाव पुढे येण्याची शक्यता आहे. मनसेकडून अंकुश पवार, सलीम शेख, सुजाता डेरे, मनोज घोडे यांची नावे चर्चेत आहेत. वंचित बहुजन आघाडीकडून संजय साबळे पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT