नाशिक

Nashik Police Transfers | 'प्रभारीं'ची होणार खांदेपालट

नाशिक पोलीस : वाढते गुन्हे, तक्रारींच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठांकडून दखल

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : शहरातील चौदा पोलिस ठाण्यांमधील प्रभारी निरीक्षकांच्या बदल्या होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिस निरीक्षकांबद्दलच्या वाढत्या तक्रारी, गुन्ह्यांचे वाढते प्रमाण, गुन्ह्यांची उकल होत नसल्याने या प्रभारींवर (Nashik in charge of police stations) दुसरी जबाबदारी सोपवून त्यांच्या जागी नव्या-जुन्या अधिकाऱ्यांना संधी देण्याच्या हालचाली सुरू आहेत.

गृह विभागाने पोलिस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून, त्यानुसार शहरातही नव्याने पोलिस निरीक्षक दाखल होत आहेत. त्यामुळे या निरीक्षकांनाही जबाबदारी देण्याचे नियोजन केले जात आहे. दरम्यान, विद्यमान प्रभारी अधिकाऱ्यांमध्ये काही प्रभारींविरोधात (Nashik in charge of police stations) थेट पोलिस आयुक्तालयापर्यंत तक्रारी आल्या आहेत. तसेच काही पोलिस ठाण्यांच्या हद्दीत गुन्हेगारी वाढत असून, त्यावर अंकुश ठेवण्यात तेथील वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना अपयश येत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे हद्दीतील वाढती गुन्हेगारी, गुन्ह्यांचा प्रलंबित तपास, रखडलेल्या कारवायांसह निरीक्षकांच्या तक्रारी वाढल्याने याची दखल वरिष्ठांनी घेतली आहे. त्यामुळे पोलिस आयुक्तालयातील वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या होण्याची शक्यता आहे. त्यानुसार काही पोलिस निरीक्षकांची यादी केली जात असून, त्यांची पोलिस ठाण्यातून बदली करीत इतर जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांच्या जागी कोणत्या अधिकाऱ्याची नियुक्ती होते याकडे नवीन-जुने पोलिस अधिकाऱ्यांमध्ये चर्चा आहे.

गतवर्षीही प्रभारींना मिळालेला दणका

गत वर्षी तत्कालीन पोलिस आयुक्तांनी तत्कालीन प्रभारी निरीक्षकांना दणका देत त्यांना इतर ठिकाणी नियुक्ती दिली होती. तसेच दुय्यम निरीक्षकांना पोलिस ठाण्यांची जबाबदारी देत काम करणाऱ्यास संधी हा संदेश दिला होता. त्यामुळे यंदाही हा संदेश देण्याचा प्रयत्न होणार असल्याची चर्चा आहे. तसेच नव्या जुन्यांचा संगम घालत नियुक्ती केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. (Nashik in charge of police stations)

गुन्हे शाखांच्या पथकांमध्येही फेरबदल

शहरातील चौदा पोलिस ठाण्यांसह गुन्हे शाखांच्या पथकांमध्येही फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सद्यस्थितीत गुन्हे शाखा युनिट एकचा अतिरिक्त पदभार असून, तेथे स्वतंत्र अधिकारी नेमण्याची चर्चा आहे. तसेच पोलिस ठाण्यांसह इतर पथकांतील अधिकाऱ्यांची आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस ठाण्यांत किंवा अकार्यकारी पदांवर नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT