नाशिक : नाशिक पोलिस आयुक्तालयातील एका महत्त्वाच्या ठाण्यात पुन्हा एकदा ठाणेदार बदलण्यात येण्याची शक्यता आहे. संबंधित ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जागी आता तरुण व ताज्या दमाच्या अधिकार्यांची नियुक्ती होणार असल्याची चर्चा सुरू आहे. शहरातील अनेक ठिकाणी नुकतेच झालेले अधिकारी बदल आणि त्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या हालचालींमुळे या बदल्याकडे अधिकच लक्ष वेधले जात आहे.
नाशिकमध्ये पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली 'कायद्याचा बालेकिल्ला' मोहीम राज्यभर चर्चेत आहे. गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी राबवलेल्या या उपक्रमामुळे शहरात पोलिस यंत्रणेची सकारात्मक प्रतिमा निर्माण झाली आहे. या मोहिमेच्या काही दिवस आधीच नाशिक रोड व उपनगर ठाणे वगळता सर्व ठाण्यांचे प्रभारी अधिकारी बदलण्यात आले होते. मोहीम सुरू होताच या बदल्यांचा हेतू सर्वांना स्पष्ट झाला झाला. पोलिस आयुक्तांनी तरुण अधिकाऱ्यांना संधी देण्यावर भर दिल्याचे दिसून आले आहे.
आयुक्तालयातील उच्चप्रतिष्ठित आणि नागरिकवस्तीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या ठाण्याचा कार्यभार कोणाकडे जाणार याबाबत चर्चेला अधिक उधाण आले आहे. शहरातील शांतता व कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून या बदल्यांना विशेष महत्त्व असल्याने नागरिक, पोलिस कर्मचारी तसेच प्रशासकीय वर्तुळातही याबाबत उत्सुकता वाढत आहे.
पोलिस आयुक्तालयात तरुण अधिकाऱ्यांचा बोलबाला
नव्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या यादीत तरुण व उत्साही अधिकार्यांचा लक्षणीय भरणा करण्यात आला आहे. तरुण अधिकाऱ्यांमध्ये पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, किरिथिका सी. एम., मोनिका राऊत, किशोर काळे, सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके, अद्विता शिंदे, पोलिस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल, गजेंद्र पाटील, उमेश पाटील, जगवेंद्र राजपूत, जयंत शिरसाट, संजय पिसे, सहायक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर, ज्ञानेश्वर मोहिते यांच्याकडे पोलिस आयुक्तालयातील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.