नाशिक

Nashik Police Patil Bharti : पाेलिसपाटीलसाठी सहा हजार, कोतवालासाठी अडीच हजार अर्ज

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; जिल्ह्यातील पोलिसपाटील व कोतवाल पदांच्या रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पोलिसपाटील पदांच्या ६६६ जागांसाठी तब्बल ६ हजार ६१ अर्ज आले आहेत. कोतवालांच्या १४६ रिक्त जागांसाठी इच्छुकांचे २ हजार ४८० अर्ज जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाले. या दोन्ही पदांसाठी येत्या २२ तारखेला परीक्षा घेण्यात येईल.  (Nashik Police Patil Bharti)

शासनाच्या मार्गदर्शनानुसार पोलिसपाटील व कोतवालांची पदे भरण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात पोलिसपाटलांची १ हजार ८४४ पदे मंजूर असून, त्या पैकी ६६६ पदे रिक्त आहेत. तसेच कोतवालांची १८२ रिक्त पदांमधून ८० टक्के म्हणजे १४६ पदांवर नेमणूक केली जाणार आहे. त्यासाठी प्रशासनाने इच्छुक उमेदवारांकडून आॅनलाइन अर्ज मागविले होते. त्यानुसार दोन्ही पदांसाठी आॅनलाइन अर्जासाठीची मुदत रविवारी (दि. ८) संपुष्टात आली असून, इच्छुकांचा त्याला चांगला प्रतिसाद लाभला. (Nashik Police Patil Bharti)

जिल्हा प्रशासनामार्फत पोलिसपाटील व कोतवाल या दोन्ही पदांसाठी येत्या २२ तारखेला एकाच दिवशी परीक्षा घेतली जाणार आहे. पोलिसपाटीलसाठी १०० गुणांची परीक्षा असून, त्यात ८० गुणांचा पेपर व २० गुण हे मुलाखतीसाठी असणार आहे. कोतवालासाठी थेट परीक्षा हाेणार असून, त्याचा लगेचच निकाल घोषित केला जाईल. मात्र, पोलिसपाटील पदासाठी मुलाखती घेतल्या जाणार असल्याने उमेदवारांना काहीकाळ प्रतीक्षा करावी लागेल.

मेरिटवरच होणार निवड

पोलिसपाटील व कोतवाल भरतीसाठी जिल्हा प्रशासनाने भंडारा येथील एका संस्थेची मदत घेतली आहे. या संस्थेकडे जळगाव येथील परीक्षेचा अनुभव आहे. स्थानिकस्तरावर प्रश्नपत्रिकांची निर्मिती केली जाईल. तसेच पदभरतीसाठी नियुक्त निवड समितीकडूनच उमेदवारांना हॉलतिकीट, परीक्षा केंद्र व अन्य माहिती दिली जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. पोलिसपाटीलांसाठी २० गुणांची मुलाखत असून, गावनिहाय आरक्षण भिन्न असल्याने तेथील मेरिटप्रमाणे यादी जाहीर होईल.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT