Police Pudhari
नाशिक

Nashik Police Irani Gang | पोलिस असल्याचे भासवणारी इराणी टोळी जेरबंद

Nashik Police Irani Gang | अंमलदार मयूर पवार यांच्या दोन वर्षांच्या अथक प्रयत्नांना अखेर यश

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पोलिस असल्याची बतावणी करून ज्येष्ठ नागरिकांना गंडा घालत सोन्याचे दागिने लुटणाऱ्या आंतरराज्यीय इराणी टोळीचा अंबड पोलिसांनी अक्षरशः सिनेस्टाईल पाठलाग करत पर्दाफाश केला आहे. सुमारे ३० किलोमीटरच्या थरारक पाठलागानंतर ओझर येथील उड्डाणपुलावर दोघांना जेरबंद करण्यात आले. या कारवाईत २०१ ग्रॅम वजनाचे अंदाजे ३० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

या कामगिरीबद्दल पोलिस आयुक्तांनी पोलिस पथकाला एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अमजद अली अकबर अली बेग (वय ४७) व फैयाज इम्तियाज अन्सारी (वय २८, दोघे रा. भिवंडी, जि. ठाणे) अशी आहेत. हे दोघे पोलिस असल्याचे भासवून नागरिकांना फसविण्यात सराईत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. आहे.

पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किशोर काळे तसेच सहायक आयुक्त डॉ. सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत व पोलिस निरीक्षक (गुन्हे) सचिन खैरनार यांनी गुन्हे शोध पथकाला आरोपींचा शोध घेण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या.

पाथर्डी फाटा परिसरात २२ फेब्रुवारीला नियमित गस्तीदरम्यान पोलिस अंमलदार मयूर पवार यांच्या सतर्क नजरेस मोटारसायकलवरून संशयास्पद हालचाल करणारे दोघे इसम दिसले. त्यांनी तत्काळ वरिष्ठांना माहिती देत पाठलाग सुरू केला.

पोलिस मागावर असल्याचे दिसताच आरोपींनी मुंबई-आग्रा महामार्गाकडे पळ काढला. मात्र एपीआय विलास पडोळकर, हवालदार योगेश देसले, सुभाष ठुबे, मयूर पवार, उल्हास गांगुर्डे, समाधान शिंदे, संदीप भुरे, सागर जाधव, संजय सपकाळे, अनिल गाढवे, फरीद इनामदार, तुषार मते, केशव ढगे, प्रवीण राठोड, सचिन करंजे व योगेश सिरसाठ यांनी जीवाची पर्वा न करता सुमारे ३० किमी पाठलाग करत ओझर उड्डाणपुलावर त्यांना घेरले.

अटकवेळी आरोपींनी झटापट करण्याचाही प्रयत्न केला. तपासात मुंबई नाका पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील सुमारे पाच तोळे सोन्याचे दागिने त्यांच्या ताब्यातून हस्तगत करण्यात आले. २०२३ पासून आतापर्यंत या टोळीवर नाशिक शहरात ४२, नाशिक ग्रामीण १०, धुळे शहर ५ व कर्नाटक राज्यात १ असे एकूण ५८ गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे.

विशेष म्हणजे गडग (कर्नाटक) येथील बेटगेरी पोलिस ठाण्यात पोलिसांवर जीवघेणा हल्ला केल्याच्या गुन्ह्यातही ते वाँटेड आहेत. पुढील तपास एपीआय विलास पडोळकर व अंमलदार वैभव एखंडे करीत आहेत.

ओझर उड्डाणपुलावर जेव्हा पोलिस व इराणी टोळीचे दोघे आरोपी यांच्यात झटापट झाली, त्यावेळी जमलेल्या नागरिकांमध्ये पोलिस व इराणी चोर कोण यामध्ये संभ्रम निर्माण झाला. इराणी चोरांनी आम्ही पोलिस असून, आम्हाला हे मारत असल्याचा दावा केला. मात्र, पोलिसांनी ओळखपत्र दाखविल्यानंतर नागरिकांना खात्री पटली आणि टोळी जेरबंद झाली.

सीसीटीव्ही फुटेजची मदत

सदर कारवाईत सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण करून आरोपींची ओळख पटविण्यात आली. वाहन, कपडे, हेल्मेट व देहबोलीचा अभ्यास करत दोन वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर मयूर पवार यांनी या टोळीचा माग काढला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT