दिंडोरी (नाशिक) : नाशिक पेठ रस्त्यावर रासेगावजवळ आयशर आणि स्विफ्ट कार यांच्यात झालेल्या अपघातात पोलिस कर्मचारी जागीच ठार झाला.
तालुक्यातील जांबुटके येथील रहिवासी रणजित मुरलीधर अपसुंदे (वय ३८) हे गंगापूर पोलिस ठाण्यात कार्यरत होते. नोकरीनिमित्त ते नाशिकला रहात होते. दिवाळी सणासाठी ते आपल्या मुळ गावी आले होते. शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास ते कामावर जाण्यासाठी आपल्या स्विफ्ट कारने नाशिककडे निघाले होते. नाशिककडुन पेठकडे जाणाऱ्या आयशर ट्रकची (जीजे15 एटी5031) रासेगावजवळ त्यांच्या कारला धडक बसली आणि रणजित अपसुंदे यांचा कारमध्येच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. पोलिसांनी या अपघातप्रकरणी ट्रकचालक राधेश्याम बच्चा (रा. उत्तरप्रदेश) याला ताब्यात घेतले आहे.
आई तु जा...हे शेवटचे वाक्य
दिवाळीसाठी घरातील सुना माहेरी गेल्याने आई वडील आणि तिघे भाऊच घरी होते. गुरुवारी (दि.23) भाऊबीज असल्याने रणजितने दिंडोरी येथील आपले मामा त्र्यंबकराव मुरकुटे यांना ओवाळण्यासाठी आईला पाठविले. घरी आवरायला कुणी नाही मी नंतर जाईल, असे आईने सांगितले. मात्र आई तु जा, मी आहे ना आवरायला...हे रणजितचे आईबरोबरील संवादात शेवटचे वाक्य ठरले.