नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पेठ रोडवरील अश्वमेधनगरमध्ये शनिवारी (दि. ३) रात्री साडेअकराच्या सुमारास पूर्ववैमनस्यातून रवि संजय उशिले (२३, रा. सप्तरंग सोसायटीच्या मागे, हरिहरनगर, पेठ रोड) याचा चॉपर व लाकडी दांड्याने हल्ला करून खून करण्यात आल्याची घटना घडली आहे.
या प्रकरणी संशयित ओम गवळी व संतोष गवळी या काका-पुतण्याला पोलिसांनी अवघ्या दोन तासांत मुंबई महामार्गावरील विल्होळी येथून ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवि उशिले हा जेवणानंतर समाधान बंडू गोन्हे याच्यासोबत गप्पा मारत घरी परतत असताना अश्वमेधनगरमधील गल्लीत येथेच राहणारा ओम गवळी याने चॉपरने, तर संतोष गवळी याने लाकडी दांड्याने हल्ला चढवला.
पाठीवर, पोटावर व | डोक्यावर झालेल्या जबर वारांमुळे रवि गंभीर जखमी झाला. त्यातच वर्मी घाव बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमुख तसेच म्हसरूळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अंकुश चिंतामण यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांसह धाव घेतली.
प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार, आरटीओ कार्यालयाजवळील गजवक्रनगरमध्ये राहणाऱ्या ओम व संतोष गवळी यांनी हा हल्ला केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तांत्रिक विश्लेषण व मानवी कौशल्याच्या आधारे दोघांना विल्होळी परिसरातून अटक करण्यात आली. प्राथमिक तपासात मुलीच्या प्रकरणावरून रवि व ओम यांच्यात यापूर्वी वाद झाल्याचे समोर आले आहे.
शनिवारी रात्री रवि पुन्हा परिसरात आल्याचे समजताच ओम काकासह तेथे पोहोचला आणि वादानंतर हा जीवघेणा हल्ला झाला. मृत रविच्या पश्चात आई असून, ती धुणीभांडी करून उदरनिर्वाह करते. एकमेव आधार गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी दोघांना न्यायालयात हजर केले असता ८ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.