जानोरी (नाशिक) : नाशिक- पेठ राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सध्या सुरू असून महामार्गावरील आंबेगण शिवारात उंबराचा माथा येथे अहिल्यानगर येथील ३८ वर्षीय युवकाचा अपघाती मृत्यू झाल्याने या प्रकरणी ठेकेदार व सुपरवायझर यांच्यावर हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप करीत दोघांविरुद्ध दिंडोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
विलास चंद्रकांत मेंगाळ (रा. जाचकवाडी, पो. बोटा, ता. अकोले, जि. अहिल्यानगर) हे ट्रक (एम.एच. १२ पी. क्यू. ९७१३) घेऊन जात असताना रस्ता दुरुस्तीचे काम सुरू होते. या ठिकाणी योग्य बॅरिकेडस, सूचना फलक, रिफ्लेक्टर, धोक्याची सूचना, रात्रीची प्रकाश व्यवस्था, ब्लिंकरर्स, रिबीन लावण्यात आलेली नव्हती. रस्ता फोडून त्यातून निघालेले सिमेंट काँक्रिटचे तुकडे बाजूला पडलेले होते. कामाची योग्य देखरेख करण्यात आलेली नव्हती. कोणतीही योग्य सुरक्षा व्यवस्था केलेली नव्हती. या निष्काळजीपणामुळे विलास मेंगाळ यांचा तेथे अपघात होऊन गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांना मृत्यू झाला. वाहनाचेही तीन लाख रुपयांचे नुकसान झाले, अशी फिर्याद दिंडोरी पोलिस ठाण्यात पोलिस शिपाई प्रवीण भोईर यांनी दिली. याबाबत ठेकेदार, सुपरवायझर व संबंधीत जबाबदार व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.