Dengue
डेंग्यू डासांचा प्रादुर्भाव file photo
नाशिक

नाशिक : डेंग्यू डासांचे ठिकाण सापडल्यास दहा हजारांचा दंड

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : गेल्या महिनाभरात डेंग्यू रुग्णसंख्या तिपटीने वाढल्याने महापालिकेचा आरोग्य-वैद्यकीय विभाग ॲक्शन मोडवर आला असून, शहरातील बांधकाम व्यावसायिक, उद्योजकांच्या बैठका घेत डेंग्यू डासांच्या उत्पत्तीस कारणीभूत ठरणाऱ्यांवर जबर दंडात्मक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. घरांमध्ये डासांची उत्पत्ती होत असल्याचे आढळून आल्यास प्रती उत्पत्ती स्थळामागे दोनशे रुपये दंड आकारला जाणार आहे. बांधकाम सुरू असलेल्या इमारती, औद्योगिक प्रकल्पांच्या तळघरांमध्ये, वाहनतळाच्या क्षेत्रांमध्ये, बेसमेंटमध्ये साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होत असल्याचे आढळल्यास पाच ते दहा हजारांपर्यंत दंड केला जाणार आहे.

  • नाशिकमध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.

  • जून महिन्यातील गेल्या २४ दिवसांत तब्बल ९४ नवे रुग्ण आढळले आहेत.

  • डेंग्यू निर्मूलनासाठी सर्वांनी संघटीत होऊन काम करण्याचे आवाहन आयुक्त डॉ. करंजकर यांनी केले आहे.

नाशिकमध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. मे महिन्यात डेंग्यूचे ३३ रुग्ण आढळले होते. जून महिन्यातील गेल्या २४ दिवसांत तब्बल ९४ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे डेंग्यू रुग्णसंख्या १९८ वर पोहोचली आहे. डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव चिंताजनक ठरत आहे. त्यामुळे वैद्यकीय विभागाने शहरातील व्यापारी, बांधकाम व्यावसायिक, उद्योजक तसेच शासकीय इमारतींच्या ठिकाणी काम करणाऱ्या प्रतिनिधींसमवेत चर्चा करून डेंग्यू उत्पत्तिस्थानांचा निपटारा करण्याचे निर्देश दिले आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर व अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. क्रेडाई, निमा, आयएमए विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना या बैठकीसाठी पाचारण करण्यात आले होते.

मनपा आयुक्तांनी दिल्या सूचना

डेंग्यू निर्मूलनासाठी सर्वांनी संघटीत होऊन काम करण्याचे आवाहन आयुक्त डॉ. करंजकर यांनी केले. शहरात डासांचा एकही ब्लॅक स्पॉट निर्माण होता कामा नये याची जबाबदारी घनकचरा विभागाची आहे. पाणीगळती होत असल्यास त्या ठिकाणी तत्काळ दुरुस्ती करून पाण्याचा निचरा करण्याची जबाबदारी पाणीपुरवठा विभागावर आहे. शिक्षण विभागाने प्रत्येक शाळेमध्ये डेंग्यू उत्पत्ती कशामुळे होते याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. इमारत बांधकामांच्या ठिकाणी पाणी साचणार नाही याची जबाबदारी संबंधित बांधकाम व्यावसायिकांची असून, बांधकाम परवानगी देताना अटी-शर्ती अंतभूर्त कराव्यात, अशी सूचनाही आयुक्तांनी यावेळी दिल्या.

डेंग्यू नियंत्रणासाठी शहरांमधील प्रमुख संघटना, सामान्य नागरिक, शासकीय कार्यालये आदींची मदत घेतली जात आहे. जून महिन्यामध्ये तिप्पट रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेऊन आपल्या घरामध्ये डेंग्यू उत्पत्तिस्थळ निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी, अन्यथा प्रतिस्थळ २०० रुपये याप्रमाणे दंड केला जाईल.
- डॉ. नितीन रावते, मलेरिया प्रमुख, महापालिका, नाशिक.
SCROLL FOR NEXT