Ajit Pawar Pudhari
नाशिक

Nashik Politics | अजितदादा, पवार साहेब आणि नाशिक !

Nashik Politics | नात्याची ऐतिहासिक वीण पुण्यासह पश्चिम महाराष्ट्राची राजकीय-सामाजिक ठेवण आणि नाशिक, नगर, धुळे, जळगावची सामाजिक रचना बऱ्याच अंशी समान आहे.

पुढारी वृत्तसेवा

डॉ. राहुल रनाळकर

पश्चिम महाराष्ट्र-नाशिक नात्याची ऐतिहासिक वीण

नात्याची ऐतिहासिक वीण पुण्यासह पश्चिम महाराष्ट्राची राजकीय-सामाजिक ठेवण आणि नाशिक, नगर, धुळे, जळगावची सामाजिक रचना बऱ्याच अंशी समान आहे. शेतीप्रधान अर्थकारण, सहकाराची परंपरा, कष्टकरी संस्कृती आणि संघर्षशील शेतकरी चळवळ हे साम्य ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी फार आधी ओळखले. त्यामुळे त्यांनी नाशिकला कधीही परिघावर ठेवले नाही; उलट केंद्रस्थानी ठेवले. याचे सर्वात ठळक उदाहरण म्हणजे आणीबाणीच्या काळात स्व. यशवंतराव चव्हाण यांना नाशिकने दिलेली साथ.

त्या विश्वासाची परतफेड म्हणून नाशिकला ओझर येथील एचएएल प्रकल्प मिळाला. जो आजही उत्तर महाराष्ट्राचा औद्योगिक कणा मानला जातो. हा वारसा पुढे नेत शरद पवारांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाला आपल्या आवडीचा मान दिला. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत अजितदादांनी नाशिकशी नाळ अधिक घट्ट केली. केवळ भाषणांतून नव्हे तर निर्णयांतून नाशिकने दिलेला राजकीय कौल आणि जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाटाफुटीनंतर झालेल्या विधानसभेत नाशिक जिल्ह्याने राज्यात सर्वाधिक आमदार राष्ट्रवादीला दिले.

परिणामी, राष्ट्रवादीच्या कोट्यातील तीन मंत्रिपदे नाशिकला मिळाली. हा केवळ योगायोग नव्हता; तो विश्वासाचा कौल होता. नाशिक हे केवळ निवडणुकांचे मैदान नव्हते; ते आंदोलनांचेही केंद्र राहिले आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, कामगारांचे हक्क, आदिवासींचे जगणे, या सगळ्या लढ्यांची ठिणगी अनेकदा नाशिकमधून पेटली. अशा संवेदनशील जिल्ह्यासाठी नेतृत्वालाही तेवढीच संवेदनशीलता लागते आणि ती अजितदादांकडे होती.

एमव्हीपी आणि शिक्षणक्षेत्र :

पवारांची दूरदृष्टी मराठा विद्या प्रसारक समाज (मविप्र) ही केवळ संस्था नाही; ती नाशिकची शैक्षणिक ओळख आहे. शरद पवार आणि अजितदादा या दोघांनीही या संस्थेला वेळोवेळी आर्थिक, प्रशासकीय आणि राजकीय पाठबळ दिले. जेव्हा संस्थेला आर्थिक अडचणी आल्या, तेव्हा अजितदादांनी अर्थमंत्री म्हणून मार्ग काढले; जेव्हा धोरणात्मक अडथळे आले, तेव्हा पवार साहेबांनी दिल्लीपर्यंत आवाज पोहोचवला. त्यामुळे आज नाशिकच्या हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य या नात्याशी जोडलेले आहे. अजितदादा नसल्याने हा आधार काही प्रमाणात कमी झाला आहे. पण आता सुनेत्रा वहिनी आणि स्थानिक नेतृत्वाने ही पोकळी भरून काढणे आवश्यक आहे.

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक :

पुनरुज्जीवनाचा निर्णायक अध्याय नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक काही वर्षांपूर्वी आर्थिक संकटात सापडली होती. कर्जबुडवे, राजकीय हस्तक्षेप, प्रशासकीय ढिसाळपणा आणि विश्वासघात यामुळे बँक बंद पडण्याच्या उंबरठ्यावर होती अशा वेळी अजितदादा पवारांनी केवळ राजकारणी म्हणून नव्हे, तर अर्थतज्ज्ञाच्या भूमिकेतून हस्तक्षेप केला. त्यांनी तीन पातळ्यांवर काम केले. आर्थिक पुनबांधणी, राज्य सरकारकडून भरीव भांडवल उभारणी, थकीत कर्जवसुलीचे पुनर्गठन आणि पारदर्शक लेखापरीक्षण यंत्रणा, प्रशासकीय सुधारणा, व्यावसायिक व्यवस्थापन, डिजिटल बैंकिंग आणि कर्जवाटपाची शिस्तबद्ध प्रक्रिया, सहकार क्षेत्राला राजकीय संरक्षण देत बँक बुडू न देण्याची ठाम भूमिका यासाठी त्यांचा पुढाकार होता. बँका वाचल्या तर शेतकरी वाचेल.

त्यामुळेच त्यांनी बँकेच्या पुनरुज्जीवनासाठी भरघोस मदत मंजूर केली. आज बँक उभी आहे, तर ती मुख्यतः अजितदादांच्या दूरदृष्टीमुळे. अर्थखाते भाजपकडे शेतकऱ्यांची चिंता अजितदादांकडील अर्थखाते आता भाजपकडे गेले आहे. त्यामुळे शेतकरीवर्गाला मिळणाऱ्या मदतीचा ओघ तसाच राहील का, हा प्रश्न निर्माण झाला आहे. वाइन उद्योग, कांदा अर्थकारण, द्राक्ष निर्यात, दूध व्यवसाय या सगळ्यांना सातत्यपूर्ण धोरणांची गरज आहे. नाशिकचा वाइन उद्योग आज देशात आघाडीवर आहे; त्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, निर्यात सवलती आणि पायाभूत सुविधा लागतील, यासाठी राष्ट्रवादीच्या नव्या नेतृत्वाने सक्रिय भूमिका घ्यायला हवी.

सुनेत्रा वहिनींची कसोटी

नरहरी झिरवाळ यांनी सर्वप्रथम सुनेत्रा वहिनींचे नाव उपमुख्यमंत्रिपदासाठी पुढे आणले आणि काही तासांतच राजकीय हालचाली गतिमान झाल्या. माणिकराव कोकाटे, छगन भुजबळ, दिलीप बनकर, नितीन पवार, हिरामण खोसकर या सर्वांनी पाठिंबा दिला. याचा अर्थ स्पष्ट आहे. नाशिकला अजूनही पवार कुटुंबावर विश्वास आहे. पण आता अपेक्षा जास्त आहेत.

अजितदादांची गुणसंपदा :

का होते सर्वपक्षीय मान्यता ? अजितदादा हे केवळ पक्षनेते नव्हते; ते राज्यकारभार समजणारे प्रशासक होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची चार वैशिष्ट्ये सर्वमान्य होती. निर्णयक्षमता वेळकाढूपणा नाही; स्पष्ट आदेश आर्थिक शिस्त अर्थसंकल्पात काटेकोर नियोजन, विकासाभिमुख दृष्टिकोन राजकारणापलीकडे जाऊन काम, रोखठोकपणा, चुकीला माफी नाही, योग्यला पाठबळ म्हणूनच विरोधी पक्षातील नेतेही त्यांचा आदर करीत. काँग्रेस, शिवसेना (उद्धव), भाजप-सगळ्यांशी कामकाजाचे सलोख्याचे संबंध त्यांनी ठेवले. शरद पवारांची भूमिका निर्णायक ठरणार राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा प्रश्न लवकर सुटेल, असे दिसत नाही. त्यामुळे शरद पवार यांची नाशिकबाबतची पुढील भूमिका महत्त्वाची ठरेल. भावनिक आंदोलनं, पक्षांतर्गत तणाव, राजकीय समीकरणे हे सर्व येणाऱ्या काळात दिसू शकते.

नाशिकला दुर्लक्ष नको :

शरद पवारांनी नाशिककडे जेवढे लक्ष दिले, तेवढेच अजितदादांनीही दिले. आता नव्या राजकीय बदलांमध्ये नाशिक बाजूला पडू नये हीच खरी कसोटी आहे. नाशिकला केवळ भाषण नव्हे; निर्णय, निधी आणि नेतृत्व हवे आहे. पवार कुटुंबाचा नाशिकशी असलेला स्नेहबंध टिकला, तरच उत्तर महाराष्ट्राचे भविष्य सुरक्षित राहील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT