Nashik Parking zones will break the deadlock; Traffic will also need discipline
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
वाहनांची वाढती संख्या आणि वाहनतळांचा अभाव यामुळे शहरात निर्माण होणारी वाहतूक कोंडी फोडतानाच, वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी महापालिका आणि पोलिसांच्या सहकार्याने शहरात पार्किंग झोन तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्त्वावर सहा चौरस किलोमीटर क्षेत्र निश्चित केले असून, त्यातील २२ ऑनस्ट्रीट व सहा ऑफस्ट्रीट पार्किंगसाठी २८ रस्ते निश्चित करण्यात आले आहेत. प्रत्येक रस्त्यावर २०० ते १५० मीटर अंतरावर नो पार्किंग व पार्किंगची व्यवस्था केली जाणार आहे. विशेष म्हणजे पार्किंग शुल्कवसुली व नो पार्किंगमधील वाहनांचे टोइंग करण्यासाठी पुढील आठवड्यात निविदा प्रक्रिया राबवून एजन्सी निश्चित करण्याचा निर्णयदेखील घेण्यात आला आहे.
शहरात वाहनतळांचा प्रश्न गंभीर झालेला आहे. प्रामुख्याने मेनरोड, सराफ बाजार, रविवार कारंजा, पंचवटी कारंजा, सीबीएस, शालिमार, त्र्यंबक रोड, कॉलेज रोड, गंगापूर रोड, मुंबई नाका या भागांत वाहनतळांची समस्या हे वाहतुकीच्या कोंडीचे कारण ठरत आहे. महापालिकेने स्मार्ट पार्किंगला चालना देण्याचा निर्णय घेतला. परंतु, त्यातील कायदेशीर अडचणीही महापालिकेच्या प्रयत्नांना खो घालणाऱ्या ठरत आहेत.
त्यामुळे महापालिका व पोलिसांच्या वाहतूक समितीच्या बैठकीत या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी संयुक्तरीत्या कामगिरी बजावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार १८०० वाहनांच्या पार्किंगसाठी सर्वाधिक वर्दळ असलेला झोन निश्चित करण्यात आला आहे. सहा चौरस किलोमीटरच्या झोनमध्ये इक्विव्हेलन्ट कार स्पेस (ईसीएस) मापक ठरविण्यात आले म्हणजेच एका कारच्या क्षमतेएवढी जागा निश्चित करून पार्किंग स्लॉट ठेवले जाणार आहेत. यासाठी २८ रस्त्यांच्या क्षेत्रांचे वाहतूक पोलिसांनी सर्वेक्षण केले. त्यातील २२ रस्त्यांवर पार्किंगची व्यवस्था केली जाणार आहे.
पार्किंगचे दर निश्चित करून एजन्सीमार्फत वसूल केले जातील. पार्किंगमधून प्राप्त महसूल महापालिका, पोलिस व नियुक्त एजन्सीत वाटप केले जाईल. ऑफस्ट्रीट पार्किंगमध्ये संपूर्ण रस्ते नो पार्किंगमध्ये असतील, तेथे वाहने लावल्यास टोइंग केले जाईल. टोइंगसाठी सहा वाहने राहतील. पोलिसांच्या मदतीने दंडाची वसुली होईल. ऑनस्ट्रीट पार्किंगमध्ये दर २०० मीटरला नो पार्किंग झोन व पार्किंग झोन असतील. यासंदर्भात महापालिका व पोलिस प्रशासनात सामंजस्य करार केला जाणार आहे.
शहरातील वाहनतळांचा प्रश्न सोडवण्यासाठी ईसीएस फॉर्म्युला अमलात आणला जाणार आहे. त्यासाठी पोलिस व महापालिकेत सामंजस्य करार केला जाईल.- प्रदीप चौधरी, अतिरिक्त आयुक्त, महापालिका
सहा चौरस किमीचे क्षेत्र...
* अशोकस्तंभ ते मुंबई नाका.
* अशोकस्तंभ ते आनंदवली.
* सिटी सेंटर मॉल ते महात्मानगर.
* महात्मानगर ते जेहान सर्कल.
* शरणपूर रोड, त्र्यंबक रोड, कॉलेज रोड.
* शरणपूर रोड ते गंगापूर नाका सिग्नल.