नाशिक, पुढारी वृत्तसेवा : बांधकाम व्यवसायाशी निगडित असणाऱ्या जयेश शहा आणि त्यांची पत्नी रक्षा शहा यांच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली आहे. रविवारी (दि. ५) रात्री ही घटना उघडकीस आली. या दाम्पत्याचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. अहवालानंतर मृत्यूचे कारण समोर येणार आहे. नाशिकच्या सरकार वाडा पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद झाली आहे. (Nashik Crime News)
याबाबत अधिक माहिती अशी की, विजय शहा आणि त्यांच्या पत्नी रक्षा शहा यांचा रविवारी रात्री मृतदेह राहत्या घरात आढळल्यानंतर खळबळ उडाली. रात्रीच्या वेळी शहा यांचा संपर्क होत नसल्याने कुटुंबाने खोलीत डोकावून बघितले. त्यावेळी दाम्पत्य बेडवर पडलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यानंतर त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासले असता दाम्पत्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. (Nashik Crime News)
विजय शहा यांच्या एका मुलाचा २० दिवसांवर विवाह सोहळा होता. रात्रीच्या वेळेला कुटुंबासोबत जेवण केल्यानंतर शहा दांपत्य आपल्या खोलीत गेले. कुटुंबातील इतर सदस्य झोपी गेले. हे पाहून शहा दांपत्याने विष प्राशन केल्याचा पोलिसांना अंदाज आहे. मात्र, विष प्राशन केलं की काही घातपात आहे, या अनुषंगाने नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. व्यवसायाच्या निगडित काही वाद निर्माण झाले होते का? या दृष्टीनेही पोलिसांनी तपास सुरू केला आहे. (Nashik Crime News)
शहा दाम्पत्याच्या शवविच्छेदनानंतर व्हिसेराही राखून ठेवला आहे. त्यामुळे शहा दाम्पत्याचा मृत्यू की आत्महत्या याबाबत शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे आता नाशिक पोलिसांचा तपास कोणत्या आणि कशा मार्गाने होतो, आणि त्यात काय समोर येतं याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.