पंचवटी : पुढारी वृत्तसेवा
चारित्र्याच्या संशयावरून संशयित आकाश सुरेश जाधव (३२) याने गुरुवारी (दि. १९) पत्नी पूजा (३०) हिची पेठ रोडवरील कोमल सोसायटी परिसरात हत्या केल्यानंतर स्वतःहून म्हसरूळ पोलिस ठाण्यात हजर झाला. मोबाइल मागितल्यानंतर तो देण्यास नकार दिल्याने झालेल्या वादातून ही हत्या झाल्याची माहिती तपासात समोर येत आहे.
आकाश आणि पूजा यांचा विवाह २०१५ मध्ये बिहार येथे झाला होता. आकाश वाहनांच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत होता. पूजा नोकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी हातभार लावत होती.
दरम्यान, आकाशला दारूचे व्यसन होते. दारू पिल्यानंतर तो पूजाच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्याशी वारंवार वाद घालून तिला मारहाण करत होता. पूजाची बहीण सुधा यादव हिने दिलेल्या फिर्यादीतून संशयिताच्या पूर्वीच्या वर्तनाची माहिती समोर आली आहे. जून २०२६ मध्ये सुधा काही काळ बहिणीकडे राहण्यासाठी आली असताना आकाशने तिच्यासमोरच पूजाला मारहाण केली होती.
'तुला एखाद्या दिवशी मारून टाकेन,' अशी धमकीही दिली होती. दारूसाठी तो सुधाकडेही पैशांची मागणी करत असे. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्याने तिलाही घरातून निघून जाण्यास सांगितले होते. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल डहाके यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. याबाबत म्हसरूळ पोलिस ठाण्यात संशयित पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.