नाशिक : सत्ताधारी भाजपचा बालेकिल्ला असलेल्या पंचवटीतील सहाही प्रभागांत प्रचाराची सांगता होत असताना भाजप विरुद्ध शिंदे शिवसेना यांच्यात काट्याची लढत दिसत आहे. सहा प्रभागांमध्ये भाजप उमेदवारांसमोर शिंदे सेनेच्या उमेदवारांनी कडवे आवाहन उभे केले आहे. आगामी कुंभमेळा पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच भागात प्रचारसभा घेतली. दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही याच भागात येत वातावरण निर्मिती केली. त्यामुळे मतदार नेमकी कोणाला साद देतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
पंचवटी परिसरातील प्रभाग एक ते सहामध्ये मंगळवारी प्रचाराची सांगता झाली. प्रचार संपुष्टात आल्यानंतर प्रशासनाने गुरुवारी (दि.15) होणाऱ्या मतदानाची तयारी सुरू केली आहे. पंचवटी विभागीय कार्यालयात निवडणुकीत मतदानाची तयारी अंतिम टप्प्यात होती. मतदान केंद्रावर साहित्य वाटप सुरू होते. सहा प्रभागांसाठी एकूण 319 मतदान केंद्रे असून, यातील 8 केंद्रे ही संवदेनशील आहेत. सहा प्रभागांतील 24 जागांसाठी एकूण 129 उमेदवार रिंगणात आहेत. एकूण 2 लाख 27 हजार 942 मतदार हे सहा प्रभागांतील 24 उमेदवारांचे भवितव्य ठरविणार आहे.
प्रमुख लढतीकडे लक्ष
प्रभाग सहामधील शिंदे शिवसेनेकडून पुरस्कृत उमेदवार माजी महापौर अशोक मुर्तडक आणि भाजपचे माजी उपमहापौर गुरुमित सिंह बग्गा यांच्यात लढत होती. दोघांनाही मनसेची सत्ता असताना सोबत काम केले. मात्र, आता एकमेकांसमोर उभे ठाकले आहे. याच प्रभागातील भाजपकडून तिकीट कापण्यात आलेले कमलेश बोडके आणि माजी नगरसेविका नंदिनी बोडके यांचे पती खंडू बोडके यांच्यातही काट्याची लढत आहे.
प्रभाग एकमध्ये माजी महापौर रंजना भानसी यांच्यासमोर भाजपचे तिकीट कापण्यात आलेले अन् शिंदे सेनेचे गणेश चव्हाण यांनी आव्हान उभे केले आहे. याच प्रभागातील ड गटात भाजपचे अमित घुगे यांच्या बंडखोरीने रंगत आणली आहे. प्रभाग दोनमध्ये तुरुंगात असलेले माजी नगरसेवक उध्दव निमसे यांचे पुत्र रिध्दीश निवडणूक रिंगणात उतरले आहे. त्यांची लढत उबाठा शिवसेनेचे वैभव ठाकरे यांच्याशी होत आहे.
प्रभाग तीनमध्ये माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या पुत्र मच्छिंद्र सानप यांना अपक्ष उमेदवार रूची कुंभारकर, उबाठाचे महेंद्र सानप, शिंदे सेनेचे हर्षद पटेल यांनी आव्हान उभे केले आहे. येथील ड गटात राष्ट्रवादी युवा शहराध्यक्ष अंबादास खैरे निवडणूक रिंगणात आहे. प्रभाग सहामध्ये आमदार हिरामण खोसकर यांच्या कन्या इंदुमती खोसकर निवडणुकीत उतरल्याने रंगत वाढली आहे. येथील क गटात भाजपचे ज्ञानेश्वर काकड यांनी बंडखोरी केली आहे.
आठ केंद्रे संवेदनशील
दरम्यान, पंचवटीतील फुलेनगर येथील मनपा शाळा क्र 9, मखमलाबाद नाका मनपा शाळा क्र. 29 येथील मतदान केंद्र तसेच हिरावाडीतील मनपा शाळेतील सहा मतदान केंद्रे ही संवेदनशील आहेत. त्यामुळे येथे चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.