नाशिक/पंचवटी : पुढारी वृत्तसेवा
पंचवटी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने आंतरराज्यीय घरफोडी व दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश करत टोळीच्या म्होरक्याला अटक केली आहे. या कारवाईत घरफोडीसाठी वापरणारे साहित्य, दागिने, रोकड, मोबाइल, घड्याळे आणि दुचाकींसह एकूण ४ लाख ४३ हजार ४६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पंचवटी, आडगाव व म्हसरूळ पोलिस ठाण्यांतील १३ गुन्हे उघडकीस आले आहेत.
पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक नियमित गस्त घालत होते. त्यावेळी एनआयटी महाविद्यालय परिसरात संशयास्पद हालचाली करणाऱ्या टोळीबाबत गुप्त माहिती मिळाली.
पोलिसांनी तातडीने सापळा रचून कारवाई केली असता धनराजसिंग बहादूर्सिंग शिख (२३, रा. अक्कलकुवा, जि. नंदुरबार) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून स्क्रू ड्रायव्हर, लोखंडी कटर, कोयता, मिरची पूड, दोरखंड आदी साहित्य जप्त केले. चौकशीत त्याने गुजरात व मध्य प्रदेशातील साथीदारांची नावेही उघड केली.
पोलिस तपासात आरोपीने पंचवटी, म्हसरूळ, आडगाव, इंदिरानगर, गंगापूरसह नाशिक शहरातील विविध भागांमध्ये घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी विविध गुन्ह्यांतील सोने-चांदीचे दागिने, भारतीय चलनातील नोटा, मोबाइल, महागडी घड्याळे तसेच चोरीच्या दोन दुचाकी हस्तगत केल्या.
या टोळीचा कार्यक्षेत्र अनेक राज्यांमध्ये असल्याचा संशय असून, त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे. या कारवाईमुळे अलीकडील अनेक घरफोड्यांचा उलगडा झाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
ही कारवाई पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त मोनिका राऊत, सहायक आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक निरीक्षक प्रशांत बोरसे करीत आहेत.