नाशिक : पंचवटी परिसरात दोन गटांमध्ये झालेल्या दगडफेक आणि गोळीबाराच्या घटनेतील संशयित आरोपी ऋषिकेश उर्फ बाबा गणेश परसे (२२, रा. कुमावत नगर) यास पंचवटी पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे.
२२ जुलै रोजी पंचवटी येथील मुंजाबा चौक, फुलेनगर परिसरात गोळीबाराची घटना घडली होती. त्यानंतर संशयित परसे हा फरार झाला होता. त्याचा शोध घेताना गुन्हे शोध पथकातील पोलिस शिपाई अंकुश काळे यांना गुप्त बातमीदारामार्फत परसे हा आडगाव नाका परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली हाेती. त्या माहितीनुसार पथकाने सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्यावर नाशिक शहरातील विविध पोलिस ठाण्यांत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे.
ही कारवाई पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस निरीक्षक सतीश शिरसाठ, उपनिरीक्षक कैलास जाधव तसेच अंमलदार महेश नांदुर्डीकर, संतोष पवार यांनी सहभाग घेतला. पुढील तपास पोलिस निरीक्षक ज्योती आमणे करत आहेत.