नाशिक : शुक्रवार (दि.12) रात्रीच्या सुमारास ओझर परिसरात झालेल्या भयंकर स्फोटाने ओझरसह आडगाव हादरले. याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यामध्ये भयंकर आग आणि धुराचा लोट दिसून येत आहे. दरम्यान, हा स्फोट नसून, डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या माध्यमातून घेण्यात आलेली रॉकेट मोटर परीक्षण चाचणी असल्याचे स्पष्ट झाल्याने नागरिकांच्या जीवात जीव आला.
शुक्रवारी (दि.१२) रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास ओझर परिसरातील जऊळके ग्रामपंचायत लगत असलेल्या डीआरडीओ कार्यालयाच्या पटांगणात स्थिर रॉकेट मोटर परिक्षण चाचणी घेण्यात आली. ही चाचणी दुपारच्या सुमारास घेणे नियोजित होते. मात्र, काही कारणास्तव रात्रीच्यावेळी घेतली गेली. ७० सेकंदाच्या चाचणी कालावधीत १८० डीबी इतका आवाजाचा स्तर अपेक्षित होता. मात्र, या चाचणीबाबत परिसरातील नागरिकांना पूर्वसूचित केले नसल्याने, अचानक झालेल्या आवाजामुळे एकच तारांबळ उडाली. रात्रीच्या अंधारात आग आणि धुराचे लोट आकाशात दिसून आल्याने, परिसरातील नागरिकांनी याबाबतचे मोबाइलमध्ये चित्रिकरण करीत ते व्हायरल केले. काही वेळातच हा व्हिडीओ अनेकांच्या मोबाइलमध्ये झळकल्याने एकच घबराट पसरली.
दरम्यान, याबाबतची माहिती पोलिसांना प्राप्त होताच त्यांनी डीआरडीओच्या संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क साधून याबाबतची माहिती घेतली. तसेच याबाबतची माहिती नागरिकांना दिली होती काय? अशी विचारणा केली. दरम्यान, डीआरडीओने अशी कुठलीच माहिती नागरिकांना दिली नसल्याने, पोलिसांनी डीआरडीओकडून याबाबतचे पत्र प्राप्त करून घेत, ते विविध व्हाॅट्स ॲप ग्रुपच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचविले. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
गेल्या महिन्यात देखील १४ आॉगस्ट रोजी अचानक झालेल्या गूढ आवाजाने दिंडोरी परिसर हादरला होता. या आवाजाची तीव्रता इतकी होती की, परिसरातील काही ठिकाणी घरांच्या खिडक्यांच्या काचा देखील फुटल्या होत्या. तब्बल २५ किलोमीटर परिसरात हा आवाज ऐकू आल्याने 'भूकंप झाला का विमान दुर्घटना?' अशा चर्चा नागरिकांमध्ये रंगल्या होत्या. पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी हा आवाज सुखोई लढाऊ विमानाच्या सरावादरम्यान झाल्याचे स्पष्ट केले. ओझर येथील एचएएल कारखान्यात तयार होणाऱ्या सुखोई विमानाचा नियमित सराव सुरू असताना ही घटना घडल्याचे पाटील यांनी सांगितले होते.
------------------
------------------------------