Nashik Ozar Airport Pudhari News Network
नाशिक

Nashik Ozar Airport | देशभरात मंदी असताना नाशिकचा ओझर विमानतळ 'ऑन टॉप'; 7 महिन्यांत 2.48 लाख प्रवाशांची नोंद

Nashik Ozar Airport | जानेवारी-जुलैमध्ये 2.48 लाख प्रवाशांची नोंद

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : सतीश डोंगरे
देशभरातील विमान प्रवासी वाहतुकीवर मंदीसह विविध कारणांचा परिणाम जाणवत असताना, नाशिकच्या ओझर विमानतळाने मात्र तुलनेने दमदार कामगिरी केली आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (एएआय) आकडेवारीनुसार, जानेवारी ते जुलै २०२६ या सात महिन्यांत ओझर विमानतळावरून एकूण सुमारे २ लाख ४८ हजार प्रवाशांनी हवाई प्रवास केला आहे.

गतवर्षी याच कालावधीत ही संख्या सुमारे २ लाख ३१ हजार होती. त्यामुळे एकूण प्रवासी वाहतुकीत सुमारे ७.३ टक्क्यांची वाढ झाली आहे. या वाढीला आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतुकीचा मोठा हातभार लागला आहे. सात महिन्यांत नाशिकच्या विमानतळावरील आंतरराष्ट्रीय प्रवाशांची संख्या ९,५८४ वर पोहोचली असून, गतवर्षीच्या ९३५ प्रवाशांच्या तुलनेत तब्बल २६.६ टक्के वाढ झाली आहे.

दुसरीकडे देशांतर्गत प्रवासी संख्येतही सात महिन्यांत ७.३ टक्के वाढ नोंदली गेली आहे. देशातील विमानतळांवर मात्र जुलैमध्ये उलट चित्र दिसून आले. 'एएआय'च्या आकडेवारीनुसार, जुलै २०२६ मध्ये देशभरातील विमानतळांवरील प्रवासी वाहतूक मागील वर्षाच्या तुलनेत कमी झाली.

देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासी संख्येतही सुमारे ४.७ आणि ४.६ टक्क्यांची घट झाली. या पार्श्वभूमीवर जुलैमध्ये नाशिकच्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांत झालेली २१.४ टक्क्यांची वाढ विशेष लक्षवेधी ठरली आहे. देशातील ५२ आंतरराष्ट्रीय विमानसेवा असलेल्या विमानतळांपैकी वाढ नोंदविणाऱ्या मोजक्या विमानतळांमध्ये नाशिकचा समावेश झाला आहे.

पहिल्या तीन महिन्यांत दमदार वाढ

२०२६ च्या सुरुवातीला नाशिक विमानतळाच्या प्रवासी वाहतुकीने झेप घेतली. जानेवारीमध्ये ओझरवरून ४२ हजार ३६७ प्रवाशांनी प्रवास केला. गतवर्षी जानेवारीत ही संख्या ३१ हजार ७३७ होती. त्यामुळे तब्बल ३३.५ टक्क्यांची वाढ झाली.

फेब्रुवारीतही प्रवासी संख्या ४१ हजार ४९८ वर पोहोचली. गतवर्षीच्या ३१ हजार ७९४ प्रवाशांच्या तुलनेत ही वाढ सुमारे ३०.५ टक्के आहे. मार्चमध्ये ४० हजार ११२ प्रवाशांची नोंद झाली. गतवर्षीच्या ३४ हजार २२१ प्रवाशांच्या तुलनेत सुमारे १७.२ टक्के वाढ झाली आहे.

देशांतर्गत प्रवासी घटले; आंतरराष्ट्रीय वाढले

जूनमध्ये नाशिक विमानतळावरून २९ हजार ८१७ देशांतर्गत प्रवाशांनी प्रवास केला. गतवर्षी जूनमध्ये ही संख्या ३२ हजार ३३८ होती. त्यामुळे ७.८ टक्क्यांची घट झाली. जुलैमध्ये ही संख्या आणखी थोडी कमी होऊन २६ हजार ९०७ झाली. गतवर्षी जुलैमध्ये २७ हजार ४० देशांतर्गत प्रवासी होते.

त्यामुळे यंदा केवळ ०.५ टक्क्यांची किरकोळ घट झाली. मात्र, या दोन महिन्यांत आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतुकीने सकारात्मक चित्र कायम ठेवले. जूनमध्ये १६३ आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी ओझरचा वापर केला, गतवर्षी ही संख्या १५२ होती. म्हणजे ७.२ टक्के वाढ. जुलैमध्ये तर मध्ये १३६ आंतरराष्ट्रीय प्रवाशांची नोंद झाली, तर गतवर्षी ही संख्या ११२ होती. त्यामुळे २१.४ टक्क्यांची वाढ झाली.

एप्रिल-मे मध्ये काहीशी घसरण

एप्रिलमध्ये मात्र नाशिकच्या विमानतळावरील प्रवासी वाहतुकीला काहीसा ब्रेक लागला. एप्रिल २०२६ मध्ये देशांतर्गत प्रवाशांची संख्या ३० हजार ९६१, तर गतवर्षी ती ३६ हजार ८२ होती. मेमध्येही ३५ हजार ९८६ देशांतर्गत प्रवासी नोंदले गेले, तर गतवर्षी ही संख्या ३७ हजार ५०९ होती. त्यामुळे एप्रिल आणि मेमध्ये वर्षानुवर्षे तुलना करता प्रवासी संख्येत घट झाली. मात्र, पहिल्या तीन महिन्यांतील मोठ्या वाढीमुळे जानेवारी-जुलै या सात महिन्यांचा एकत्रित आलेख अद्याप सकारात्मक राहिला आहे.

"नाशिकच्या हवाई वाहतुकीतील या वाढीमागे शहराची बदलती आर्थिक आणि पर्यटनविषयक ओळख महत्त्वाची ठरत आहे. नाशिकमध्ये वाढणारे उद्योग, व्यवसाय, औद्योगिक गुंतवणूक आणि कॉरपोरेट हालचालींमुळे व्यावसायिक प्रवाशांची संख्या वाढत आहे. आगामी सिंहस्थात हा आकडा आणखी वाढणार आहे."
— मनिष रावल, उपाध्यक्ष, निमा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT