देवळा : तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून, तो अजुनही थांबलेला नाही. त्यामुळे कांद्याची लहान रोपे पुर्णतः पिवळी पडून सडून गेली आहेत. त्याच बरोबर इतरही पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला गेला आहे.
या भागात अनेक ठिकाणी लाल कांद्याची लागवड झाली आहे. काही काढणीवर आला आहे. त्याचे या पावसामुळे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांनी उन्हाळी कांद्यासाठी महागडे कांदा बियाणे खरेदी केलेले असून, त्या कांद्याच्या रोपांचे या बेमोसमी पावसामुळे नुकसान झाले आहे. या झालेल्या नुकसानीचे कुठलेही निकष न लावता, तातडीने सरसकट पंचनामे करुन शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्याची गरज आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने जिल्ह्यातील सर्व महसूल , मंडळ व कृषी विभाग यांना तातडीने पंचनामे सुरू करण्याचे आदेश देण्यात यावेत अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव , उपाध्यक्ष रवींद्र शेवाळे, रामक्रुष्ण जाधव, जिल्हा संपर्कप्रमुख अशोक शेवाळे, तालुका अध्यक्ष बंडु आढाव, कैलास कोकरे आदींनी केली आहे.