नाशिक : श्रीलंका सरकारने आयात शुल्कात कपात केल्यामुळे कांद्याचे दर वाढतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, ही आशा फोल ठरली असून, कांद्याच्या दरात दोन दिवसांपासून मोठी घसरण झाली आहे. तामिळनाडूतील फेंगल चक्रीवादळाच्या भीतीने कांद्याची आवक वाढल्याने लासलगाव, मनमाड, नांदगाव आदी बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याच्या सरासरी दरात प्रति क्विंटल ८०० ते १ हजार रूपयांची घसरण झाली आहे. कांद्याच्या दरात घसरण होऊ लागल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे.
श्रीलंका सरकारने नुकतीच कांद्यावरील आयात शुल्क ३० टक्यांवरून १० टक्के करण्याचा निर्णय घेतला. यामुळे कांदा निर्यातदारांनीदेखील समाधान व्यक्त केले होते. त्यामुळे भारतीय कांदा श्रीलंकन बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात जाऊ शकेल. या निर्णयामुळे कांद्याला दरही चांगले मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. परंतू, या निर्णयानंतर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. गेल्या आठवड्यात लाल कांद्याला प्रति क्विंटल ४ हजार ३०० रुपये भाव मिळाला होता. मंगळवारी (दि. ३) त्याच कांद्याला सरासरी ३ हजार ५०० रुपये भाव मिळाला आहे. कांदा दरात मोठी घसरण झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. एकीकडे ढगाळ हवामानामुळे लागवड केलेल्या कांद्यावर करपा आणि बुरशीजन्य रोग लागत असताना त्यावर महागडी औषधे मारावी लागत आहे. तर दुसरीकडे कांद्याच्या दरात घसरण झाल्याने शेतकरी दोन्ही बाजूने होरपळला जात आहे.
सोमवारी लाल कांद्याला येवला बाजारात २९०० रुपये, लासलगाव विंचूर बाजारात ३८०० रुपये तर देवळा बाजारात ३५०० रुपये दर मिळाला. गेल्या आठवड्यात लाल कांदा भाव (प्रति क्विंटल) कमीत कमी १५०० रूपये होता. तर जास्तीत जास्त ५५०० रूपये आणि सरासरी ४३०० रूपये होता.
कमीत कमी १०००, जास्तीत जास्त ५१०१ तर सरासरी ३५००
तामिळनाडूतील फेंगल चक्रीवादळाच्या भीतीने कांद्याची आवक वाढली आहे. लाससगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या दोन दिवसात जवळपास १६४६ ट्रक, पीकअप कांद्याची आवक झाली आहे. महिनाभरापूर्वी म्हणजेच ३ नोव्हेंबर रोजी लाल कांद्याची आवक ८५ ट्रक, पीकअप होती. चक्रीवादळामुळे पावसाची भीती असल्याने अनेक शेतकऱ्यांनी कच्चा कांदा बाजारात आला आहे. राजस्थानमधील कांदा बाजारात येत आहे. त्याची देखील आवक वाढली आहे. लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात बाजारात आली आहे. परिणामी कांद्याची आवक जास्त आणि कच्चा कांदा असल्याने बाजारात कांद्याचे दर घसरले आहेत.
दोन दिवसांपासून बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक वाढली आहे. महिनाभराच्या तुलनेत ही आवक तिपटीने वाढली आहे. चक्रीवादळाच्या भीतीने कच्चा कांदाही बाजारात आला. राजस्थानमधील कांद्याची आवक वाढल्याने कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. कांद्याची आवक ही कमी होण्याची शक्यता कमी आहे.- भारत दिघोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटना