लासलगाव : कांद्याचे बाजारभाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने ‘नाफेड, एनसीसीएफ’मार्फत किंमत स्थिरीकरण निधीतून पाच लाख मेट्रिक टन खरेदी करण्यात आला. त्यातून ८४० टन कांदा शनिवारी (दि. १६) रात्री रेल्वे मालगाडीतून किसनगंज (दिल्ली) येथे पाठविण्यात आला.
येथील ‘नाफेड व एनसीसीएफ’च्या गोडाउनमधून आतापर्यंत दिल्लीसाठी दोन हजार ५२० टन कांदा पाठवण्यात आला, तर ८४० टन कांदा चेन्नई येथील कोरूकीपिटू येथे पाठवत कांद्याच्या वाढलेल्या भावापासून सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे.
किरकोळ दरात कांद्याने ८० रुपये प्रतिकिलोचा टप्पा पार होताच ग्राहकांना वाजवी दरात कांदा मिळावा, म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या आठवड्यात साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला होता. त्यानंतर कांदा दरात एक हजार रुपयांची घसरण झाल्याचे दिसून आले. उन्हाळ कांद्याची आवक कमी झाली असून, नवीन कांदाही अजून कमी प्रमाणात येत आहे. त्यामुळे गेल्या काही आठवड्यात कांदा भावात तेजी पाहायला मिळाली होती.
लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल कांद्याला किमान १६००, कमाल ४९०० व सरासरी ४५००, तर उन्हाळ कांद्याला किमान २९००, कमाल ४९०५, तर सरासरी ४७०० रुपये असा भाव मिळाला.