नांदगाव : गेल्या काही दिवसांपासून कांदा दरात सुरू असलेली घसरण थांबण्याचे नाव घेत नसल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. सद्यस्थितीत नांदगाव बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत आहे. मागील १० दिवसांत ९६ हजार ३२० क्विंटल इतकी आवक झाली आहे. मंगळवारी (दि. २४) लाल कांद्याला कमाल १,९३०, किमान २००, तर सरासरी १,५०० रुपये प्रतिक्विंटल इतका दर मिळाला. गेल्या १० दिवसांच्या तुलनेत ही प्रतवारीनुसार दोन ते तीन हजारांनी घसरण आहे.
गुजरात, मध्य प्रदेश, दक्षिणेकडील कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांतून मोठ्या प्रमाणात लाल कांदा बाजारात येत आहे. परिणामी, देशांतर्गत मागणी पूर्ण होऊन अतिरिक्त कांदा शिल्लक राहात आहे. मागणी आणि पुरवठ्याच्या गणितात सुरू असलेल्या बाजारभावातील घसरणीमुळे निर्यात खुली होण्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
यंदा खराब वातावरणामुळे कांदा उत्पादनात घट झाली. त्यात आमचा कांदा बाजारात आला आणि बाजारभाव गडगडले. सरकारने वस्तुस्थिती जाणून घेत कांदा दर सुधारण्यासाठी उपाययोजना कराव्यात.नितीन सदगीर, कांदा उत्पादक शेतकरी, सोयगाव, नाशिक
देशांतर्गत लाल कांदा मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाला असून, त्यातून अतिरिक्त ठरणारा कांदा निर्यात होण्यासाठी त्यावरील शुल्क हटवायला हवे. सध्या कांद्याचे दर कमी झाले आहेत.सतीश बोरसे, सभापती, कृ.उ.बा. समिती, नांदगाव, नाशिक