लासलगाव : दीपावलीनिमित्त सहा दिवसांपासून बंद असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवार (दि. ४) पासून कांदा आणि भुसार शेतमालांचे लिलाव पूर्ववत सुरू झाले. मुख्य बाजार आवारात लाल कांद्याला ३,३२१ रुपये प्रतिक्विंटल, तर उन्हाळ कांद्याला ४७७० रुपये प्रतिक्विंटल सरासरी भाव मिळाला. शनिवार (दि.२) च्या तुलनेत उन्हाळ कांद्याच्या कमाल दरात ५०० रुपयांची, तर लाल कांद्याच्या कमाल दारात ८० रुपये प्रतिक्विंटलची वाढ झाल्याचे दिसून आले.
कांदा दरात अल्पशी भाववाढ दिसत असली तरी उन्हाळ कांदा हा मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये साठवलेला असून, त्याच्या वजनात मोठ्या प्रमाणात घट आणि प्रतवारी खालावली आहे. त्यामुळे वाढलेल्या भावाचा फायदा मिळत नसल्याची खंत शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
शनिवारी (दि.२) मुख्य बाजार समितीत लाल कांद्याला किमान ९०१, कमाल ३७१६, तर सरासरी ३५०१ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. तर उन्हाळ कांद्याला किमान ३९००, कमाल ४८००, तर सरासरी ४४०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला होता. २८ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबरअखेर दीपावली सणानिमित्त मजूरवर्ग कामावर येणार नसल्याने कांदा लिलाव ठप्प झाले होते.
सोमवारी (दि.४) २८ वाहनांद्वारे ३४६ क्विंटल आवक होऊन लाल कांद्याला किमान १४००, कमाल ३८००, तर सरासरी ३३२१ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. तर उन्हाळ कांद्याची १०३ वाहनांतून १,२४८ क्विंटल आवक होऊन किमान २७५१, कमाल ५३०० सरासरी ४७७० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.