नाशिक

नाशिक : जिल्ह्यात बरसल्या मान्सूनच्या सरी अन् वीज पडून एकाचा मृत्यू, पशुहानी देखील

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – मनमाड, चांदवड, लासलगावसह ठिकठिकाणी मंगळवारी (दि.११) पावसाने हजेरी लावली. खादगाव (ता.नांदगाव) येथे वीज अंगावर पडल्याने विलास गायकवाड (२८) यांचा मृत्यू झाला. तसेच पशुहानी देखील झाली आहे.

मान्सून जिल्ह्यात डेरेदाखल झाला आहे. दुष्काळाच्या झळा झेलणाऱ्या नांदगाव-मालेगावसह चांदवड तसेच निफाडच्या काही भागाला मंगळवारी (दि.११) रोजी वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपून काढले. त्यामुळे अगोदरच उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना आनंद सरींमुळे दिलासा मिळाला आहे. चांदवड तालुक्यात तिसगाव येथे अशोक गांगुर्डे यांचा बैल तसेच निमगव्हाण येथील सुभाष चाैगुले यांच्या बैलाच्या अंगावर वीज पडून ते जागीच गतप्राण झाला आहे. तर देवरगाव रोडवरील रोहिणी जाधव यांच्या नर्सरी व शेडचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

राज्यात यंदा दोन दिवस अगोदरच मान्सूनचे आगमन झाले आहे. आतापर्यंत त्याने अर्ध्याहून अधिक महाराष्ट्र व्यापला आहे. नाशिक जिल्ह्यातही ७ जूनपासून वादळी वाऱ्यासह मृगाच्या जोरदार सरी बरसत आहेत. जिल्ह्यात १ तारखेपासून ते आजपर्यंत सरासरी ५६.५ मिमी पर्जन्याची नोंद झाली आहे. दरम्यान, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्राला पावसाने झोडपून काढले आहे. येत्या तीन ते चार दिवसांमध्ये जिल्ह्यात पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT