लासलगाव : धनत्रयोदशी च्या दिवशी लासलगाव शहरातील चोथानी ट्रेडिंग कंपनीच्या बारदान गोदामाला भीषण आग लागून लाखो रुपयांचे बारदान आगीत जळून खाक झाल्याची घटना सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान घडली आहे. घरात आणि दुकानात कोणीही नसल्याने जीवितहानी टळली.
लासलगाव येथील शेकडो युवकांच्या धाडसी प्रयत्नाने आग विझवण्यात यश आले. आशिया खंडातील कांद्यासाठी मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव शहरांमध्ये अग्निशामक दलाचा बंब नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला गेला.
आग लागल्याचे समजताच लासलगाव येथील युवक आणि सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी या ठिकाणी धाव घेतली. पाणी टँकरने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने आग आटोक्यात येण्यात अडचण येत होती. साधारणता अर्धा ते पाऊण तासांमध्ये मनमाड आणि येवला येथील अग्निशामक बंब दाखल झाल्याने मोठ्या शर्तीनंतर आग शमवण्यात अग्निशामक दलाला यश आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, लासलगाव येथील कांदा पॅकिंग साठी लागणाऱ्या बाडदान गाठीचे गोडाऊन जितेंद्र चोथानी यांचे मालकीचे आहे. लासलगाव-विंचूर रोड या अत्यंत रहदारी वरील रस्त्यालगत दि २९ ऑक्टोंबर रोजी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास गोडाऊनमध्ये ठेवलेले लाखो रुपयांचे बारदान आगीत जळून खाक झाले. आग इतकी भीषण होती की धुराचे मोठे लोळ उठत होते. या आगीमुळे गोदमा मध्ये ठेवलेले बारदान जळून खाक झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
आग लागण्याचे समजता जवळच्या दुकानातील कामगारांनी,सामाजिक कार्यकर्ते यांनी जीवाची बाजी लावत आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला.अग्निशामक दलाचे बंब आल्यानंतर आगीचे प्रमाण थोडेफार कमी झाले. परंतु प्रचंड ज्वाला आणि धुराचे लोट आकाशात दिसू लागल्याने नागरिक भयभीत झाले. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कपड्याचे आणि मोबाईल चे दुकान असून दुकानदारही या आगीने भयभीत झाले होते. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही तसेच किती रुपयांचे नुकसान झाले ते देखील समजू शकले नाहीत.
मंगळवारी बाडदान दुकानाला लागलेल्या भीषण आगेत आग विझवण्यासाठी लासलगावला कोणतेही अग्निशामक दलाच्या गाडीची सुविधा नसल्याने पर्यायाने परिसरातील मनमाड, येवला ,पिंपळगाव बसवंत या गावावर अवलंबून राहावे लागले.भविष्यात अशा अप्रिय घटना टाळण्यासाठी लासलगावला अग्निशामक दलाची सुद्धा उपलब्ध करून देण्याचे मागणी पुन्हा नागरिकांकडून केली जात आहे.