नाशिक : सतीश डोंगरे
गडचिरोलीतील आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन चिमुकल्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने पावसाळ्यातील सर्पदंशाचा धोका पुन्हा अधोरेखित झाला आहे. नाशिक जिल्हाही त्याला अपवाद नाही. उपलब्ध आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, नाशिक जिल्ह्यात २०२५ या वर्षात तब्बल ४ हजार ६१३ सर्पदंशाच्या घटना नोंदल्या गेल्या आहेत.
पावसाळ्यात साप बिळांमधून तसेच अडगळीच्या ठिकाणांहून बाहेर पडत असल्याने घर, गोठे, शेत, शाळा आणि वसतिगृहांच्या परिसरात नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.
नाशिक अपर आयुक्तालयाच्या अखत्यारित सध्या २१४ शासकीय आश्रमशाळा असून, त्यात सुमारे ९१ हजार ३७० विद्यार्थी शिक्षण घेत असल्याची आदिवासी विकास विभागाची उपलब्ध आकडेवारी आहे. यातील १० शाळा कन्याशाळा आहेत.
शाळेच्या परिसरातील गवत, कचरा, दगड-लाकडाचे ढीग, भिंतीतील फटी, दरवाजांची स्थिती, खिडक्यांना जाळ्या, विद्यार्थ्यांच्या झोपण्याची व्यवस्था आणि जवळच्या रुग्णालयाशी असलेली आपत्कालीन संपर्क व्यवस्था यांचे परीक्षण करण्याची आवश्यकता आहे. खिडक्या-दरवाजांना सुरक्षित जाळ्या बसवणे आणि रात्री पुरेसा प्रकाश ठेवणे आवश्यक आहे.
रात्री घराबाहेर पडताना टॉर्चचा वापर करावा.
शेतात, गवतात किंवा अडगळीच्या ठिकाणी जाताना बूट किंवा बंद पादत्राणे वापरावीत.
लाकूड, दगड, कचरा किंवा गवताचे ढीग हाताने हलवू नयेत.
घराभोवतीचे गवत व कचरा नियमितपणे साफ करावा.
झोपण्यापूर्वी अंथरूण, चादर आणि पादत्राणे तपासावीत.
घरात साप दिसल्यास त्याला मारण्याचा किंवा पकडण्याचा प्रयत्न न करता सर्पमित्र अथवा वनविभागाची मदत घ्यावी.
जिल्ह्यात मानवी वस्तीजवळ आढळणाऱ्या प्रमुख विषारी सापांमध्ये नाग, मण्यार, घोणस आणि फुरसे यांचा समावेश होतो. शेतशिवारात नाग व घोणसाचा वावर अधिक आढळतो, तर मण्यारसारखे निशाचर साप रात्रीच्या वेळी घरांच्या परिसरातही आढळू शकतात.
नाग - मण्यार : यांच्या विषाचा मज्जासंस्थेवर परिणाम होऊ शकतो.
घोणस - फुरसे : यांच्या विषामुळे रक्तस्त्राव, सूज आणि रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत गंभीर बिघाड होऊ शकतो.
दंश झाल्यास रुग्णालय गाठा!
सर्पदंश झाल्यानंतर घरगुती उपचार, मंत्र-तंत्र किंवा जखम कापण्यासारख्या उपायांमध्ये वेळ घालवू नये. दंश झालेला अवयव शक्य तितका स्थिर ठेवून तातडीने जवळच्या रुग्णालयात नेणे हा सर्वात महत्त्वाचा उपाय आहे. साप पकडण्यासाठी वेळ वाया घालवू नये."पावसाळ्यात विषारी साप अडगळीत आधार शोधत असतात. घराबाहेर ठेवलेल्या बुटांमध्ये ते सहज वास्तव्य करतात. त्यामुळे विशेषतः मुलांचे बूट घालताना ते झटकूनच घालावेत. सेल्फी घेण्यासाठी एखाद्या दगडावर चढताना विचार करावा. या दिवसांमध्ये झाडावर चढणे टाळावे. एखाद्यास सर्पदंश झाल्यास त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात घेऊन जावे. शरीरावर कुठलाही चिरा किंवा अघोरी उपचार करणे टाळावे."- माणिक कुमावत, सर्पमित्र
ग्रामीण भागात सर्पदंशाबरोबरच विंचवाचे दंश, काही विषारी कोळी आणि इतर कीटकांच्या दंशाकडेही दुर्लक्ष करता येणार नाही. विशेषतः पावसाळ्यात घरांच्या भिंती, लाकूड-दगडांचे ढीग, जुन्या वस्तू, शेतीची अवजारे आणि अंधाऱ्या जागांमध्ये अशा जीवांचा वावर वाढू शकतो. म्हणून घर, शाळा, वसतिगृहे, अंगणवाडी, गोठे आणि शेतातील कामाच्या ठिकाणी नियमित स्वच्छता व परिसर व्यवस्थापन हीच प्राथमिक प्रतिबंधात्मक उपाययोजना ठरते.