Old Trees Felling in Nashik  
नाशिक

Old Trees Felling in Nashik | ५०० वर्षांच्या वृक्षांची कत्तल; वाढत्या तापमानाचे कारण

नियोजनशून्य विकास निफाडच्या मुळावर

पुढारी वृत्तसेवा

निफाड : निफाड तालुक्याची ओळख महाराष्ट्राचे कॅलिफोर्निया आणि हिवाळ्यातील कडाक्याच्या थंडीसाठी होती. तो तालुका आता आगीच्या झळा सोसत आहे. शनिवारी निफाडचा पारा ४२.६ अंशांवर पोहोचल्याने दशकातील उच्चांकी उष्णतेची नोंद झाली. मात्र, या निसर्गचक्र बदलण्यामागे प्रशासनाचा नियोजनशून्य विकास जबाबदार असल्याची संतप्त भावना नागरिक व्यक्त करत आहेत. रस्ते रुंदीकरणाच्या नावाखाली नुकतीच कोठुरे ते करंजगाव या मार्गावरील ५०० वर्षांहून अधिक जुन्या ऐतिहासिक वृक्षांची केलेली अमानुष कत्तल निफाडच्या भविष्यासाठी शाप ठरली आहे.

कोठुरे फाटा ते करंजगाव रस्त्यावर पिढ्यानपिढ्या सावली देणारी चिंचेची महाकाय झाडे अलीकडेच तोडण्यात आली. विशेष म्हणजे, रस्ता आखताना तांत्रिकदृष्ट्या रस्त्याची अलाइनमेंट थोडी बदलून किंवा रस्ता दुसऱ्या बाजूने वळवून ही झाडे वाचवणे सहज शक्य होते. अनेक देशांत आणि राज्यांत पुरातन वृक्ष वाचवण्यासाठी रस्ता वळवला जातो. मात्र, निफाडमध्ये प्रशासनाने झाडे वाचवण्याच्या कष्टापेक्षा ती तोडण्याचा सोपा मार्ग निवडला. यामुळे ५०० वर्षांचा इतिहास एका दिवसात मातीमोल झाला. यापूर्वी शिवरे फाटा ते नांदूरमध्यमेश्वर रस्त्यावरील ब्रिटिशकालीन शेकडो वडाच्या झाडांचीही अशीच कत्तल झाली होती. या रस्त्यांवरून प्रवास करताना उन्हाच्या झळांनी नागरिक हैराण होत असून, एकेकाळी असणारी शीतल सावली आता केवळ आठवणीत उरली आहे.

दुसरीकडे, झाडे तोडताना नवीन वृक्षारोपणाचे जे आश्वासन दिले जाते, ते केवळ कागदावरच असल्याचे विदारक चित्र आहे. ज्या ठिकाणी कत्तल झाली, तिथे नवीन झाडे लावली गेली नाहीत आणि जिथे लावली तिथे त्यांच्या संगोपनाअभावी ती वाळून गेली. तालुक्यात अनेक शासकीय जागा आजही ओसाड पडून आहेत. महसूल, सार्वजनिक बांधकाम आणि रेल्वे विभागाच्या मालकीच्या या मोकळ्या जमिनींवर घनदाट वृक्षारोपण करण्याची संधी असतानाही प्रशासन याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. केवळ १५ जूनला वृक्षारोपणाचे सोहळे साजरे केले जातात, पण प्रत्यक्षात निफाडचा निसर्ग ओरबाडला जात आहे.

वाढत्या उष्णतेमुळे शेतीचे आणि जनजीवनाचे मोठे नुकसान होत आहे. जर प्रशासनाने आता तरी शहाणपण दाखवून जुने वृक्ष वाचवण्यासाठी रस्त्यांचे नकाशे बदलले नाहीत आणि शासकीय जागांवर युद्धपातळीवर वृक्षलागवड केली नाही, तर निफाडची ओळख वाळवंट म्हणून व्हायला वेळ लागणार नाही. विकास हवाच, पण तो निसर्गाच्या मृतदेहावर उभा नसावा, अशी आर्त हाक आता निफाडचा सामान्य नागरिक देत आहे.

प्रशासनाने जुनी झाडे तोडताना जी तत्परता दाखवली, तीच तत्परता मोकळ्या शासकीय जागांवर वृक्षारोपण करण्यासाठी का दाखवली जात नाही.

- उत्तमराव निरभवणे, जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT