नाशिक : पुढारी वृत्तसेवा
'स्वच्छ, सुंदर, हरित नाशिक'ची संकल्पना वास्तवात उतरविण्यासाठी महापौर हिमगौरी आहेर आडके व महापालिका आयुक्त मनीषा खत्री अॅक्शन मोडवर आल्या असून, यंदाच्या पावसाळ्यात महापालिकेच्या उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागामार्फत तब्बल एक लाख झाडांची लागवड केली जाणार आहे.
या वृक्षलागवडीचे नियोजन अंतिम टप्प्यात असल्याची माहिती उद्यान अधीक्षक विवेक भदाणे यांनी दिली आहे. महापालिकेच्या उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाच्या माध्यमातून दरवर्षी पावसाळ्यात वृक्षारोपण मोहीम हाती घेतली जाते.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्ते विकासासह उभारल्या जात असलेल्या विविध प्रकल्पांसाठी वृक्षतोड करावी लागत आहे. या वृक्षतोडीच्या बदल्यात यंदा मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड प्रस्तावित करण्यात आली आहे. एक लाख वृक्षलागवडीचे नियोजन केले जात असून, देशी प्रजातीच्या वृक्षांची लागवड केली जाणार आहे.
शहरातील नागरिकांसह विविध सामाजिक, स्वयंसेवी संस्था, व्यापारी, उद्योजक, शैक्षणिक संस्था तसेच शासकीय कार्यालयांना या वृक्षलागवड मोहिमेत सहभागी करून घेतले जाणार आहे. ठेकेदारांमार्फतही वृक्षलागवड केली जाणार आहे. कॉलनी अंतर्गत खुले भूखंड, रस्त्यांलगत, तसेच नदी-नाल्यांकाठी वृक्षलागवड करण्याचे नियोजन असल्याचीही माहिती भदाणे यांनी दिली.
मियावाकी पद्धतीने वृक्षलागवड
उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागामार्फत मियावाकी पद्धतीने वृक्षलागवड केली जाणार आहे. मियावाकी ही जपानी पद्धत आहे, त्यामध्ये कमी जागेत दाट आणि विविधतेने युक्त असे जंगल तयार केले जाते. वड, पिंपळ, बहावा, अर्जुन, पांगारा, काटेसावर, चिंच, तामण, करंज, जांभूळ, आंबा, सीताफळ, अशोक, कांचन, कैलासपती व चाफा यांसारख्या भारतीय प्रजातीच्या वृक्षांची लागवड केली जाणार आहे.
वर्षभरात नाशिकला हरित करणार
नाशिक हिरवाईने नटविण्यासाठी २२ एप्रिल २०२६ या जागतिक वसुंधरा दिनापासून पुढील वर्षभर स्वच्छ, सुंदर व हरित नाशिक मोहिमेंतर्गत वृक्षलागवडीची मोहीम राबविण्याचे महापौर हिमगौरी आहेर -आडके यांनी जाहीर केले आहे. वर्षभरात नाशिकला हरित नाशिक होणार असून, वृक्षप्रेमींनी वृक्षतोड होते म्हणून रडत बसण्यापेक्षा वृक्षलागवड करून दाखवावी असे आवाहन महापौरांनी पर्यावरणप्रेमींना केले आहे.
वृक्षलागवड व संवर्धनासाठी १२ कोटी
२०२६-२७ या आर्थिक वर्षाकरिता वृक्ष प्राधिकरणासाठी तब्बल २५ कोटींचे अंदाजपत्रक अंतिम करण्यात आले आहे. यात नवीन वृक्षलागवड व वृक्ष संवर्धनाकरिता तब्बल १२.१० कोटींची भरीव तरतूद करण्यात आली आहे. वृक्षांच्या संरक्षणासाठी एक कोटीच्या वृक्ष संरक्षक जाळ्या खरेदी केल्या जाणार आहेत. त्याशिवाय जुन्या वृक्ष संरक्षक जाळ्यांच्या दुरुस्तीसाठी १९ लाखांची तरतूद करण्यात आली आहे.
यंदाच्या पावसाळ्यात महापालिकेच्या माध्यमातून एक लाख झाडांची लागवड करण्याचे नियोजन आहे. सर्वसामान्यांसह, व्यापारी, उद्योजक, विविध शैक्षणिक संस्था, शासकीय कार्यालयांना या मोहिमेत सहभागी करून घेतले जाणार आहे.- विवेक भदाणे, उद्यान अधीक्षक, महापालिका