मुंबईत पाच हजार सोसायट्यांचा जीर्णोद्धार म्हाडाकडेच! Pudhari
नाशिक

MHADA Scam | धास्तावलेल्या अधिकाऱ्यांची दांडी, आचारसंहितेमुळे महासभा तहकूब

MHADA Scam | म्हाडा घोटाळ्यात अटकेच्या धास्तीमुळे गेल्या आठवडाभरापासून रजा टाकत परागंदा झालेल्या नगररचना आणि बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी बुधवारी (दि. २०) महासभेलाही दांडी मारल्याचे दिसून आले.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

म्हाडा घोटाळ्यात अटकेच्या धास्तीमुळे गेल्या आठवडाभरापासून रजा टाकत परागंदा झालेल्या नगररचना आणि बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी बुधवारी (दि. २०) महासभेलाही दांडी मारल्याचे दिसून आले. यामुळे या प्रकरणात अधिकाऱ्यांना जाब विचारण्याच्या तयारी असलेल्या नगरसेवकांचा हिरमोड झाला. दरम्यान, दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर विधान परिषद निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे महासभा तहकूब करण्यात येत असल्याचे महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी जाहीर केले.

म्हाडा घोटाळा प्रकरण गेल्या काही महिन्यांपासून गाजत आहे. एक एकर अथवा त्यापेक्षा अधिक क्षेत्राच्या भूखंडाचा विकास करताना २० टक्के क्षेत्र अथवा सदनिका आर्थिक दुर्बल चटकासाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. मात्र, हा नियम पायदळी तुडवत सातबाऱ्यावर भूखंडाचे तुकडे करून आर्थिक दुर्बल घटकांना हक्काच्या घरापासून वंचित ठेवण्याचा घोटाळा उघडकीस आला आहे.

या प्रकरणात पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले असून, राज्य शासनानेदेखील या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी नेमली आहे. या प्रकरणात महसूल, भूमी अभिलेख आणि महापालिका नगररचना विभागातील अधिकाऱ्यांची नावे समोर आली आहेत. पोलिसांकडून सुरू असलेल्या कारवाईत आतापर्यंत महसूल विभागातील नायब तहसीलदार, भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक बिपीन काजळे, तसेच महापालिकेच्या नगररचना विभागाचे सहसंचालक कल्पेश पाटील यांना अटक करण्यात आली आहे.

याशिवाय महापालिकेच्या एक कार्यकारी अभियंता, एक उपअभियंता व एका कनिष्ठ अभियंत्याची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली असून, महापालिकेचे अनेक अधिकारी अजूनही चौकशीच्या रडारवर आहेत. त्यामुळे नगररचना व बांधकामच्या अधिकारी दीर्घ रजा टाकत गायब झाल्याने महापालिकेत शुकशुकाट पसरला आहेत.

महापौर हिमगौरी आहेर आडके यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी महासभा बोलविण्यात आली होती. या महासभेत हे अधिकारी हजर राहतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु अपेक्षेप्रमाणे संबंधित अधिकारी गैरहजर राहिले. दरम्यान, दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर महापौरांनी विधान परिषद निवडणूक आचारसंहितेचे कारण देत महासभा तहकूब करण्यात येत असल्याचे जाहीर केले.

आंदोलनाचा प्रयत्न अयशस्वी

म्हाडा घोटाळ्याचा संदर्भ देत नगरसेवक मुकेश शहाणे यांनी महासभेत फलक झळकावत आंदोलनाचा प्रयत्न केला. म्हाडा घोटाळ्याची चौकशी लावल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त करताना मनपाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालू नका, अशा आशयाचा मजकूर या फलकावर होता. परंतु महापौरांनी महासभा तहकूब केल्याने शहाणे यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT