Nashik Kumbh Mela 2027  Pudhari News Network
नाशिक

Nashik Kumbh Mela | नाशिककरांची पाण्याची चिंता मिटणार! सिंहस्थ कुंभमेळा आणि शहरासाठी महापालिकेचा मोठा वॉटर प्लॅन

Nashik Kumbh Mela | लोकसंख्या वाढ, कुंभमेळ्याची गरज लक्षात घेऊन महापालिकेचे नियोजन

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
यंदा अल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, समाधानकारक पावसामुळे नाशिकसह मराठवाड्याची चिंता दूर झाली आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक मनपाने कुंभमेळा आणि शहराच्या नियमित पाणीपुरवठ्यासाठी स्वतंत्र पाणी नियोजन सुरू केले आहे. नियमित वापरासाठी ६,६०० दलघफू तर सिंहस्थासाठी स्वतंत्र १,५०० दलघफू (१.५ टीएमसी) पाणी आरक्षित करण्याची मागणी जलसंपदा विभागाकडे केली जाणार आहे.

महापालिकेने यापूर्वी ऑक्टोबर २०२५ ते जुलै २०२६ या कालावधीसाठी ६,४०० दलघफू पाण्याची मागणी केली होती. शहराला दररोज ६०० दशलक्ष लिटर (सुमारे २१ दलघफू) पाणीपुरवठा केला जात आहे.

मात्र, वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील गरज लक्षात घेता यंदा नियमित वापरासाठी ६,६०० दलघफू पाण्याची मागणी केली जाणार आहे. त्याशिवाय गंगापूर धरण समूहातून अर्धा टीएमसी (५०० दलघफू) आणि मुकणे धरणातून एक टीएमसी (१००० दलघफू) पाणी सिंहस्थासाठी आरक्षित ठेवण्याचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.

सिंहस्थासाठी स्वतंत्र पाणी नियोजन

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात सुमारे १० कोटी भाविक, साधू-महंत नाशिकमध्ये येण्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. त्यामुळे शहरातील पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. महापालिकेच्या प्राथमिक अंदाजानुसार सिंहस्थ काळात शहरासाठी दररोज सुमारे ६८० दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असेल.

याशिवाय पर्वणीकाळात भाविकांसाठी दररोज आणखी २६० दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासणार आहे. त्यापैकी १५० दशलक्ष लिटर पाणी साधुग्रामसाठी, तर ११० दशलक्ष लिटर पाणी शहरातील विविध भागांमध्ये वास्तव्यास असलेल्या भाविकांसाठी लागणार आहे.

या सर्व गरजांचा विचार करता सिंहस्थ काळात अतिरिक्त ८५० दलघफू पाण्याची आवश्यकता भासणार असल्याने नियमित आरक्षणाव्यतिरिक्त १,५०० दशलक्ष घनफूट (१.५ टीएमसी) पाणी स्वतंत्रपणे आरक्षित करण्याची मागणी केली जाणार आहे.
पर्वणीच्या कालावधीत सुमारे तीन महिने गोदावरीत पाणी वाहते ठेवण्याची आवश्यकता असल्याने त्याचाही विचार पाणी आरक्षणात करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर यांनी दिली.

पाणी आरक्षणाचा आढावा

  • सध्याचे पाणी आरक्षण : ६,४०० दलघफू

  • शहराचा सध्याचा पाणीपुरवठा : दररोज ६०० दशलक्ष लिटर (२१ दलघफू)

  • नियमित वापरासाठी प्रस्तावित आरक्षण : ६,६०० दलघफू

  • सिंहस्थासाठी स्वतंत्र मागणी : १,५०० दलघफू (१.५ टीएमसी)

  • सिंहस्थ काळातील शहराची अपेक्षित गरज : ६८० दशलक्ष लिटर प्रतिदिन

  • पर्वणीकाळातील भाविकांसाठी अतिरिक्त गरज : २६० दशलक्ष लिटर प्रतिदिन (साधुग्राम १५०, शहरातील भाविक ११० दशलक्ष लिटर)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT