नाशिक

Nashik News : छटपूजेनिमित्त फुलला गोदाघाट, उत्तरभारतीयांची गर्दी

गणेश सोनवणे

नाशिक पंचवटी : पुढारी वृत्तसेवा- दिवाळीनंतर कार्तिक चतुर्थीच्या दिवशी होणारा उत्तरभारतीय बांधवांच्या छटपूजेचा सोहळा रविवारी सायंकाळी गोदाघाटावर मावळत्या सूर्याला अर्घ्य देत मोठ्या उत्साहात झाला. यावेळी व्रतस्थ महिला व पुरुषांनी नदीपात्रात कमरेपर्यंत पाण्यात उभे राहून मनोभावे छटमातेचे पूजन केले. पूजा-अर्चा व आरती केल्यानंतर भाविक आपल्या घरी जाण्यासाठी माघारी फिरत होते. तर व्रतस्थ भाविक रात्रभर नदीपात्रात उभे राहून सोमवारी (दि.२०) सकाळी उगवत्या सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर व्रताची विधिवत सांगता केली जाणार आहे.

उत्तरभारतीय बांधवांचा अत्यंत महत्त्वाचा उत्सव मानला जाणाच्या पहिल्या दिवशी नहाय-खाय, दुसऱ्या दिवशी खरना, तिसऱ्या दिवशी सूर्यास्तसमयी सूर्याला पहिले अर्घ्य देऊन चौथ्या दिवशी सकाळी उगवत्या सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर या व्रताची सांगता होते. उत्तरभारतीय बांधवांच्या घरोघरी शुक्रवारी (दि.१७) नहाय खाय अर्थात मन व शरीराची शुद्धी करण्यात येऊन छटपूजेस प्रारंभ झाला. सात्विक आहार घेऊन या उत्सवाची सुरुवात होत असते. दुसऱ्या दिवशी शनिवारी (दि.१८) खरना म्हणजे व्रतस्थ महिला व पुरुषांनी निर्जला उपवास करीत मनोभावे छटमातेचे पूजन केले. कार्तिक शुद्ध षष्ठी अर्थात रविवारी (दि.१९) सूर्यास्त होण्याच्या दोन तास अगोदर गोदापात्रात उभे राहून मावळत्या सूर्याची पूजा करण्यात आली. सूर्य अस्ताला गेल्यावर अर्घ्य देऊन याठिकाणी मांडण्यात आलेली पूजा सामग्रीची मनोभावे पूजन करून आरती करण्यात आली.

उत्तरभारतीय बांधवांची दुपारी चारनंतर गोदाघाटावर गर्दी वाढण्यास सुरुवात झाली. पोलिसांनी रामकुंडाच्या दिशेने येणारे मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. रामकुंडासह लक्ष्मणकुंड, गांधीतलाव, धनुषकुंड, सीताकुंड, दुतोंड्या मारुती जवळील नदीपात्रापासून गाडगे महाराज पुलापर्यंत उत्तरभारतीय बांधवांनी छटपूजेसाठी गर्दी केली होती. यानिमित्ताने रामकुंडावर गांधीतलावाजवळ गणराज सेवाभावी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने भोजपुरी गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक तथा निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे उपस्थित होते. यावेळी महंत भक्तिचरणदास महाराज, माजी आमदार बाळासाहेब सानप, पूर्व विधानसभा आमदार राहुल ढिकले, के. सी. पांडे, गणराज सेवाभावी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे उमापती ओझा यांसह मान्यवर व उत्तरभारतीय बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT