मनमाड (नाशिक) : मनमाड रेल्वेस्थानकावर अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणाऱ्या १९ वर्षीय संशयिताला रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) जवानांच्या सतर्कतेमुळे ताब्यात घेण्यात आले आहे. पीडितेला तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले असून, पुढील तपासासाठी दोघांना पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, गुरुवारी (दि. १) सायंकाळी ८.३० च्या सुमारास, आरपीएफ जवान वसीम शेख हे मनमाड स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर ड्युटीवर असताना त्यांनी एका तरुण आणि तरुणीला संशयास्पद स्थितीत फिरताना पाहिले. विचारपूस केली असता दोघांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांना आरपीएफ पोलिस ठाण्यात आणले. येथे उपनिरीक्षक दीपक गायकवाड यांनी दोघांची सखोल चौकशी केली असता, संशयित तरुणाने आपले नाव कपिल पूनम राठोड (१९, रा. कदम बस्ती, लोणी काळभोर, पुणे), तर मुलीने आपले वय १६ वर्षे असल्याचे सांगितले. त्यांनी त्यांच्या घरच्यांना न सांगता पळून आल्याची कबुली दिली. मुलीकडून तिच्या घरच्यांचा मोबाईल नंबर घेऊन त्यांना घटनेबाबत माहिती देण्यात आली. तेव्हा मुलीच्या भावाने याप्रकरणी लोणी काळभोर (पुणे) पोलिस ठाण्यात तिच्या अपहरणाची फिर्याद दाखल असल्याचे सांगितले. त्यानुसार संबंधित पोलिस ठाण्यालाही खबर देण्यात आली.
दरम्यान, रात्री महिला पोलिस कर्मचारी मधुस्मिता रगडे यांच्या देखरेखीखाली मुलीला ठेवण्यात आले. शुक्रवारी (दि. २) दुपारी ४.३० वाजता लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे अधिकारी शहाजी कुंभार, हवालदार तौसिफ सय्यद, पीडित मुलीची आई आणि मावशी मनमाड येथे दाखल झाले. अधिकृत कागदपत्रांच्या पडताळणीनंतर आणि लेखी विनंतीनुसार, संशयित राठोड आणि पीडित मुलीला अधिकृत आत्मसमर्पण प्रक्रियेनंतर पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.