देवळाली कॅम्प : भगूर नगर परिषदेच्या वतीने पाईपलाईन दुरुस्तीसाठी खोदलेला खड्डा काम झाल्यानंतरही तसाच ठेवल्याने या खड्ड्यात दुचाकी घसरुन दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अमित रामदास गाढवे(44) असे मयत दुचाकीस्वाराचे नाव असून नागरिकांनी मृतदेह पालिका प्रवेशव्दारावर ठेवत आंदोलन केले. पालिका मुख्याधिकारी सुवर्णा दखणे व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत मयत गाढवे यांच्या पत्नीस नगरपालिकेमध्ये कामास घेण्याबरोबरच परिवारास आर्थिक मदत दिली जाईल, तसेच संबंधित कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले.
भगूर नगरपालिका परिसरातील वेताळबाबा रोडवरील तुळसा लॉन्सजवळ पाण्याची पाईपलाईन गळत असल्याने सकाळी या ठिकाणी दुरुस्तीसाठी खड्डा खोदण्यात आला होता. मात्र पाईपलाईन दुरुस्त केल्यानंतर देखील हा खड्डा तसाच सोडून कर्मचारी निघून गेले. सायंकाळच्या सुमारास पाऊस सुरू असताना गाढवे हे आपल्या दुचाकीवरुन घरी परतत असताना या खड्ड्याचा अंदाज न आल्याने त्याची मोटारसायकल खड्ड्यात आदळली. खड्डा खोल असल्याने डोक्यात हेल्मेट असूनही अमित गाढवे यांचा जागीच मृत्यू झाला. स्थानिकांनी गाढवे यांना तत्काळ दवाखान्यात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासणी करून गाढवे यांना मूर्त घोषित केले. अपघाताची घटना एका सोसायटीमधील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. घटनेनंतर या सीसीटीव्हीचे फुटेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी प्रसारित होताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत या घटनेस जबाबदार असणाऱ्या नगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करत आंदोलन सुरू केले. स्थानिक तसेच गाढवे यांच्या नातेवाईकांनी मृतदेह पालिका प्रवेशद्वारासमोर ठेवत भर पावसात आंदोलन केले. तर छत्रपती शिवाजी महाराज चौकात काकासाहेब देशमुख, विक्रम सोनवणे, कैलास भोर, कैलास गायकवाड, गणेश हासे, प्रसाद आडके, प्रभाकर पाळदे आदींनी धरणे आंदोलन सुरू केले.
आंदोलनाची माहिती मिळताच पालिका मुख्याधिकारी सुवर्णा देखणे यांनी गाढवे यांच्या नातेवाईक आणि आंदोलकांची भेट घेत चर्चा केली. मयत गाढवे यांच्या पत्नीला पालिका सेवेत घेण्याबरोबरच या परिवाराला आर्थिक मदत देण्याचे मान्य केले. तसेच या घटनेला जबाबदार असलेल्या कर्मचाऱ्यास निलंबित करणार असल्याचेही मान्य करत लेखी आश्वासन दिले. त्यानंतरच नातेवाईकांनी गाढवे यांच्यावर अंत्यसंस्कार केला. देवळाली कॅम्प वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांनीही आंदोलकांची समजूत काढली. दरम्यान मयत गाढवे यांच्या कुटूंबात तेच एकमेव कमवती व्यक्ती होती. या घटनेने गाढवे कुटुंबीय उघड्यावर पडले आहेत.