नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क
महापालिकेकडे वारंवार तक्रार करूनही वडाळागाव परिसरात नियमित पाणीपुरवठा होत नाही असा आरोप करीत नागरिक आणि महिलांनी सोमवारी (दि. १२) रोजी महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनवर संतप्त मोर्चा काढून प्रशासनाचा निषेध केला.
वडाळागाव परिसरातील सादीकनगर, मेहबूबनगर, मुमताजनगर, गुलशननगर, मदिनानगर, मेहमुदा सोसायटी, एस. एन. पार्क, म्हाडा बिल्डींग परिसरातील रहिवाशी महिलांनी सोमवारी (दि. १२) रोजी आमदार देवयानी फरांदे यांच्या उपस्थितीत महापालिकेवर संतप्त मोर्चा काढला आहे. मोलमजुरी आणि कष्टकरी वर्गाची वसाहत या भागात वास्तव्यास आहे. परंतु, महापालिकेकडून या भागात पुरेसा पाणीपुरवठा केला जात नाही. या भागातील नागरिकांना नियमित पाणीपुरवठा होत नसल्यामुळे याबाबतच्या तक्रारी निवेदनाद्वारे पालिकेकडे वारंवार करण्यात आल्या आहेत. नियमित पाणीपुरवठा झाल्यास मोलमजुरी करणाऱ्यांची पाण्यासाठीची वणवण थांबणार आहे. यावेळी आंदोलकांनी प्रशासनासोबतच चर्चा करीत या मागण्यांची पूर्तता करण्याचा आग्रह धरला आहे.