Accident file photo
नाशिक

Nashik news | अंबड एमआयडिसीमध्ये हायड्रा क्रेनच्या धडकेत महिला ठार

अपघातानंतर काही क्षण परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले

पुढारी वृत्तसेवा

सिडको : अंबड एमआयडीसीमध्ये मंगळवारी (दि.) सायंकाळच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका ५६ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गयाबाई काशिनाथ बोडके ( ५६, रा. रोप्य को-ऑपरेटिव्ह सोसायटी, चुंचाळे शिवार) या आपल्या रोजच्या कामासाठी एमआयडीसी परिसरातील चहाची टपरी उघडण्यासाठी निघाल्या होत्या. सायंकाळी चार ते पाच वाजेच्या त्या हॉटेल वेलकमजवळ रस्ता ओलांडत असताना समोरून येणाऱ्या हायड्रा क्रेनने त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की गयाबाई बोडके या जागीच कोसळल्या. अपघातानंतर काही क्षण परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच त्यांचा मुलगा मोहन बोडके घटनास्थळी पोहोचला. त्याने तातडीने आपल्या आईला जिल्हा शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

गयाबाई बोडके या एमआयडीसी परिसरात चहाची टपरी चालवत होत्या आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत्या. त्या नेहमीप्रमाणे टपरी उघडण्यासाठी जात असतानाच काळाने त्यांच्यावर घाला घातल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अपघातास कारणीभूत असलेल्या हायड्रा क्रेन चालकाचा शोध घेण्यात येत आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT