प्रसंगावधान बाळगत चिमुकली पुन्हा आईच्या कुशीत गेली. Pudhari News Network
नाशिक

Nashik News | जेव्हा चिमुकली नकळत रिक्षात जाऊन बसते...

चिमुकलीच्या आईचा काळजाचा ठोका चुकला

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : दोन बहिणी जिल्हा रुग्णालय अर्थात वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णास पाहून पुन्हा रिक्षाने घराकडे परतत होत्या. त्यावेळी त्या प्रवेशद्वारावर रिक्षात बसल्या असता एक पाचवर्षीय चिमुकली त्यांच्यासह रिक्षात येऊन बसली. दोघींनी रिक्षाचालकास मुलीबाबत सांगितले असता रिक्षाचालकाने मुलीस सरकारवाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. तर दुसरीकडे चिमुकलीच्या आईचा काळजाचा ठोका चुकला होता. मात्र, पोलिसांनी चौकशी करीत चिमुकलीचा ताबा पुन्हा आईस दिला.

अश्विनी केशव साळवे (रा. इंदिरानगर) ही तरुणी तिच्या बहिणीसह मंगळवारी (दि. १) दुपारी तीनच्या सुमारास वैद्यकीय महाविद्यालयात मैत्रिणीस भेटण्यासाठी आली होती. दोघी बहिणी पुन्हा इंदिरानगरला जाण्यासाठी रिक्षात बसल्या असता तितक्यात एक पाचवर्षीय मुलगी अश्विनीजवळ येऊन बसली. पालकांविना असलेली चिमुकली पाहून अश्विनीने ही बाब तिने रिक्षाचालकास सांगितली. रिक्षाचालकाने चौकशी करीत पालक आढळून न आल्याने रिक्षासह अश्विनी व चिमुकलीस सरकारवाडा पोलिस ठाण्यात नेले. ठाणे अंमलदार बाकेराव माळोदे यांना घटना सांगितली. माळोदे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून रुग्णालयाच्या पोलिस चौकी व्हॉट्सअप ग्रुपवर मुलीचा फोटो टाकून पालकांचा शोध सुरू केला. तर दुसरीकडे चिमकुलीची आई मुलगी दिसत नसल्याने रडत होती. रुग्णालयात शोधाशोध करीत पोलिस चौकी गाठली. त्यावेळी मुलगी सरकारवाडा पोलिस ठाण्यात असल्याचे आईला समजले. त्यानंतर पोलिसांनी चिमुकलीच्या आईस सरकारवाडा पोलिस ठाण्यात नेत मुलीचा ताबा आईला दिला.

अशी घडलेली घटना

दिंडोरी तालुक्यातील दरभंगी येथील विवाहिता अडीच वर्षाच्या कुपोषित मुलाच्या उपचारासाठी रुग्णालयात आली होती. मुलास तपासणीसाठी खालील मजल्यावर जात असताना विवाहितेने तिच्या पाचवर्षीय मुलीस कक्षाबाहेरच बसण्यास सांगितले होते. मात्र, चिमुकली खेळता खेळता रुग्णालयाबाहेर गेल्याचे समोर आले आहे. सुदैवाने अश्विनी साळवे व रिक्षाचालकाच्या सतर्कतेने चिमुकली पुन्हा आईच्या कुशीत गेली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT