नाशिक : महापालिका निवडणूक महायुतीद्वारे लढविण्याचे आदेश पक्षाचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आहेत. त्यानुसार महायुतीतील जागा वाटपाबाबत येत्या दोन दिवसांत भाजप नेते तथा कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा केली जाणार आहे. शिवसेनेला सन्मानजनक जागा मिळाव्यात, अशी अपेक्षा आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री तथा शिवसेना (शिंदे गटाचे) नेते दादा भुसे यांनी दिली.
महापालिका निवडणुकीसाठी भाजपपाठोपाठ शिवसेना शिंदे गटातील इच्छुकांच्या मुलाखतींना सुरुवात गुरुवारी (दि. १८) मायको सर्कल येथील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात मंत्री भुसे यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना भुसे यांनी निवडणुका महायुतीद्वारे लढविण्यास शिवसेना सकारात्मक असल्याचा पुनरुच्चार करताना, जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चितीसाठी मंत्री महाजनांसमवेत येत्या एक-दोन दिवसांत बैठक होणार असल्याचे स्पष्ट केले. महायुतीसंदर्भात आपली महाजन यांच्यासमवेत भ्रमणध्वनीवर चर्चा झाली आहे. शुक्रवारी-शनिवारी महाजन नाशिक दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांच्यासमवेत जागा वाटपाबाबत चर्चा केली जाईल. १०० प्लसचा भाजपचा नारा हा महायुतीसंदर्भात असल्याचा दावा करत शिवसेनेला सन्मानजनक जागा मिळाव्यात, मेरिटनुसार उमेदवारी दिली जावी, अशी पक्षाची भूमिका असल्याचे त्यांनी नमूद केले.
गत निवडणुकीत शिवसेनेच्या ३५ हून अधिक जागा निवडून आल्या होत्या. मधल्या काळात अन्य पक्षांतील १३ माजी नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले आहेत. इतकेच नव्हे, तर गत निवडणुकीत पक्षाच्या २२ उमेदवारांना दुसऱ्या क्रमांकाची मते होती, याचा विचार जागा वाटपाच्या चर्चेप्रसंगी व्हावा, अशी शिवसेनेची अपेक्षा आहे, असे सांगत भाजप-सेनेची नैसर्गिक युती असल्याने पक्षादेशानुसार आधी भाजपशी युतीबाबत चर्चा होईल, पक्षनेत्यांच्या पुढील निर्देशांनुसार राष्ट्रवादी अजित पवार गटाशी युतीबाबत भूमिका घेतली जाईल, असेही भुसे यांनी स्पष्ट केले.
...ते निर्णय शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाच्या काळातील
लाडकी बहीण योजना, सिडकोतील घरे फ्री होल्ड, नाशिककरांना घरपट्टी दरवाढीतून सवलत, सार्वजनिक मिळकतींच्या भाडेदरात सवलत आदी विकासाचे निर्णय एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत घेतले गेले आहेत. या मुद्द्यांच्या आधारे शिवसेना निवडणूक मैदानात उतरणार असल्याचे सांगत विकास हाच पक्षाचा निवडणूक अजेंडा असणार आहे, असेही भुसे यांनी स्पष्ट केले.
नगर परिषदांमध्ये 'नाशिक जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला'
नगर परिषद निवडणुकांमध्ये शिवसेनेला घवघवीत यश मिळेल, असा दावा करताना, 'नाशिक जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला' अशी घोषणाच मंत्री भुसे यांनी दिली. मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासंदर्भात न्यायालयाच्या आदेशांनुसार मुख्यमंत्री निर्णय घेतील, असे नमूद करत यावर अधिक भाष्य करणे भुसे यांनी टाळले. तपोवनातील वृक्षतोडीला शिवसेनेचा विरोध कायम असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.