नाशिक

Nashik News | पाणी टंचाई दाह वाढला; ग्रामीण भागातील जनतेचे होताहेत हाल

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात टंचाईचा दाह वाढला असून, तब्बल ३७७ गावे-वाड्यांना ११९ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यात दिवसागणिक टँकरचा फेरा वाढत असताना प्रशासनाला टंचाई निवारण बैठकीचा विसर पडला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेचे हाल होत आहे.

गेल्या वर्षी पावसाने पाठ फिरवल्याने जिल्ह्यात टंचाई जाणवत आहे. प्रमुख चोवीस धरणांमध्ये ५७ पाणीसाठा शिल्लक आहे. दुसरीकडे गावोगावी पाण्याचे स्त्रोत आटल्याने ग्रामीण जनतेपुढे पाण्याचे भीषण दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. त्यामुळे पाण्यासाठी जनतेला टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. सद्यस्थितीत सात तालुक्यांतील १२३ गावे तसेच २५४ वाड्यांना ११९ टँकरने पाणी पुरविण्यात येत आहे. टैंकरच्या दिवसाला २५६ फेऱ्या होत आहेत. गेल्या वर्षी याच काळात ९२ गाव आणि १६१ वाड्या अशा एकूण २५३ ठिकाणी ८५ टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात होता. नांदगावला टंचाईचा सर्वाधिक फटका बसतो आहे. तालुक्यात ३७ गावे १६२ वाड्यांसाठी ३५ टैंकर सुरू आहेत. त्याखालोखाल येवल्यात २३ टँकरने ३२ गावे लाणि १५ वाड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे.  याव्यतिरिक्त बागलाणमध्ये १५, चांदवडला ११, देवळ्यात ९, मालेगावला १७ तर सिन्नरमध्ये ९ टँकरने पाणी पुरविले जातोय. टँकरसोबत प्रशासनाने पाणीपुरवठ्यासाठी ४७ विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. दरम्यान, ऊन तापायला सुरुवात झाली आहे. चालू महिन्याच्या अखेरीस उन्हाचा कडाका वाढू शकतो. त्यासोबत ग्रामीण भागात दुष्काळाची परिस्थिती अधिक चिंताजनक होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे प्रशासनाने पालकमंत्र्यांच्या अध्यक्षेत टंचाई निवारणासाठी बैठक घेणे अपेक्षित होते. परंतु, अद्यापही या बैठकीला मुहूर्त लागला नसल्याने ग्रामीण जनतेला पाण्यासाठी दाहीदिशा फिरावे लागू शकते.

आचारसंहितेमुळे दुर्लक्ष
लोकसभा निवडणुकांचा बिगुल २० फेब्रुवारीनंतर कोणत्याही क्षणी वाजू शकतो त्यामुळे मंत्री व शासनाकडून २० तारखेच्या आतच प्रमुख कार्यक्रमांसाठी तारखा दिल्या जात असल्याची खात्रीलायक माहिती मिळते आहे. एकदा निवडणूक घोषित झाल्यानंतर संपूर्ण यंत्रणा त्यात गुंतून पडले. अशावेळी टंचाईचा मुद्दा बाजूला पडणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला सर्वाधिक फटका बसणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने वेळीच लक्ष घालत टंचाई निवारणाकरिता आतापासून नियोजन करणे आवश्यक आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT